“बार्टी” फेलोशिप आंदोलनाला यश… मान्य झाली मागणी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

861 विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल आहे. “बार्टी” च्या फेलोशिप मागणीसाठी सुरू असलेल्या मागणी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर फेलोशिपची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. गेल्या 50 दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) पात्र या विद्यार्थ्यांकडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले. या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएचडीसाठी 2021 या वर्षात नोंदणी झालेल्या 861 संशोधकांना बार्टी या संस्थेने पात्र ठरवले आहे. मात्र, सरकारकडून निधीच्या कमतरतेचे कारण पुढे केलं गेल्यानं अनुसूचित जाती प्रवर्गाचे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. सध्या फक्त 200 विध्यार्थ्यांनाच फेलोशिप मिळेल अशी माहिती आहे. गेल्या 53 दिवसापासून संशोधक विद्यार्थी आपले संशोधन आणि अभ्यास केंद्रे सोडून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करत होते. विद्यार्थी कल्याणच्या बुद्ध विहारात आश्रय घेतात आणि आंदोलनासाठी पुन्हा आझाद मैदानात जमतात, अशी परिस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.