मोठा निर्णय.. मासिक पाळीत मिळणार सुट्टी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मासिक पाळीमध्ये मुलींना खूप शारीरिक वेदना होत असतात. या दिवसांमध्ये त्यांना आरामाची गरज असते. म्हणून विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करून मासिक पाळीत विद्यार्थिनींना सुट्टी मिळणार आहे. मध्य प्रदेशासह देशातील पहिले विधी विद्यापीठ असलेले मध्य प्रदेशातील जबलपूरच्या धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने (DNLU) विद्यार्थिनींना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाने ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रापासून विद्यार्थीनींसाठी मासिक पाळीच्या रजेचा आदेश जारी केला आहे. या निर्णयाचे सर्वदूर स्वागत केले जात आहे.

मासिक पाळीच्या सुट्या देण्याची मागणी

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. शैलेश एन हादली यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टुडंट बार असोसिएशनच्या वतीने विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या सुट्या देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या डीन स्टुडंट वेलफेअर मार्फत या सेमिस्टरपासून रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुट्ट्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देण्यात येणाऱ्या सहा सुट्ट्यांचा एक भाग असतील. तसेच मुलींना मासिक पाळीच्या काळात या सुट्ट्यांचा लाभ घेता येईल.

गैरसमज दूर होतील

विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळीच्या सुट्टीमुळे विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास मदत होईलच, पण मासिक पाळीशी संबंधित सामाजिक गैरसमजही दूर होतील. नैसर्गिक गरजा स्वीकारल्या पाहिजे. या उपक्रमामुळे एकूण शैक्षणिक अनुभवही वाढेल.

या देशापासून झाली सुरूवात

काही महिन्यांपूर्वी स्पेन देशाच्या संसदेने मासिक पाळीदरम्यान रजेबाबत मोठा निर्णय घेतला होता. मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत असलेल्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा देण्याच्या कायद्याला संसदेने गुरुवारी मंजुरी दिली होती. असा कायदा करणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला होता. स्पेन हा युरोपियन युनियनमधील चौथा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.