लोकशाही संपादकीय लेख
गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा एकजूट करण्याचे खरे श्रेय मनोज जरांगे पाटील यांचेच आहे. एक साधा, सरळ माणूस, कमी शिकलेला, भाषा सुद्धा त्यांची खेडवळ.. परंतु एका ध्येयाने प्रेरित होऊन जीवाची परवा न करता मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून जिद्दीने पेटलेले. यांना अख्या महाराष्ट्र मराठा समाजाकडून डोक्यावर घेतले. सध्या सभेला गर्दी खेचणाऱ्या वक्तव्यांमध्ये देशात तीन नावांची चर्चा आहे. त्यात मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा समावेश आहे.
शिवपुराण कथा सांगणारे प्रदीप मिश्रा, बागेश्वर महाराज आणि जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. पंडित प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर महाराज यांचे अध्यात्मिक चिंतन तसेच ओघवत्या भाषेने भाविकांवर फार मोठा प्रभाव पडतो आणि भाविक त्यांच्या प्रेमातच पडतात. परंतु जरांगे पाटील हे एका समाजाचे नेतृत्व करणारे साधे व्यक्तिमत्व, परंतु मराठा आरक्षणाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी लढा देत असल्याने संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी एकसंघ उभा आहे. सुरुवातीला बीड जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाचे आंदोलन पुकारले. त्यावेळी शासनाने पोलिसी बळाचा वापर करून जरांगे पाटलांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. निष्पाप लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. अश्रु धुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यातून आंदोलक पसार होतील असे शासनाला वाटले होते, तथापि लाठीमार प्रकरण शासनावरच उलटले. शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनावर लाठीमार केल्याने आंदोलनाचा फज्जा उडेल या भ्रमात महाराष्ट्र शासन असताना लाठीमाराचा आदेश कोणी दिला? हा प्रश्न कळीचा मुद्दा बनला होता.
गृहमंत्री फडणवीस यांच्यापासून सर्वांनीच हात वरती केले. शेवटी शासनावर लाठी माराबाबत माफी मागण्याचे नामुष्की उडाली. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व समाज एकसंघ व एकजूट झाला. त्यानंतर बीड जिल्ह्यात हिंसाचार पसरवून त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु आंदोलन शमण्या ऐवजी चिघळले. पुन्हा जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. उपोषणाने जरांगे पाटलांची प्रकृती खालावली परंतु जरांगे मागे हटले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्र ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जंगी सभा घेतल्या. सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांपासून काही मंत्र्यांनी जरांगे पाटलांची थेट भेट घेऊन ‘उपोषण करू नका आम्ही टिकणारे आरक्षण देऊ’ त्यासाठी वेळ मागून घेतला. तथापि ठरलेल्या मुदतीत शब्द पाळला नसल्याने मुंबईला मराठा मोर्चा वळविला. परवाच नवी मुंबईत कोट्यावधी मराठा समाज धडकला मुंबईत आझाद मैदान देखील अपुरे पडेल म्हणून मुंबईत जरांगे पाटलांनी येऊ नये, यासाठी नोटीस बजावली. पाटलांनी तो आदेश झिडकारला. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणारच हे जाहीर केले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून सर्वांची धावपळ सुरू झाली आणि मराठा आरक्षण देण्यासाठी अध्यादेश जारी केला. मनोज जरांगे पाटील जिंकले. अध्यादेश करण्यासंदर्भात बनवाबनवी केली तर पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे स्पष्ट केले..
संपूर्ण मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही भूमिका घेतली. परंतु छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जो वादविवाद झाला, तो छगन भुजबळांना अशोभनीय होता. मंत्रीमंडळात राहून ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची आरोप प्रत्यारोप करायचे ते करायला नको होते. यात जरांगे पाटील वरचढ राहिले. छगन भुजबळ पूछाडीवर गेले हे स्पष्ट झाले…!