लोकशाही विशेष
संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव धनु राशीतून निघून मकर (Makar Rashi) राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायण (Utarayan) सुरू होते असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. श्रीमद्भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्ण उत्तरायणाची महिमा ही सांगितली आहे. मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. जास्त करून पांढऱ्या तीळीला जास्त प्राधान्य दिले जाते. तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तिळाचे सेवन केल्यास रोगांपासून आपले संरक्षण सुद्धा होते. तसेच थंडीपासूनही संरक्षण होते आणि याच कारणासाठी मकरसंक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू करून वाटले जातात. तिळामध्ये तांबे, मॅगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटामिन बी१, बी६, थायामिन फोलेट, नियासिन, सेलेनियम, झिंक यासारखे पौष्टिक तत्व असतात.
तिळाचे फायदे
मधुमेहापासून संरक्षण
तिळामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे मधुमेहाशी दोन हात करण्यासाठी उपयोगी ठरतात. तीळ मधुमेहाच्या रूग्णांसाठी हृदयासंबंधित समस्या सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याशिवाय तीळ शरीरामध्ये इन्शुलिनचा स्तर नियंत्रित करण्यासाठीही मदत करतात. यामुळे मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते आणि मधुमेह आटोक्यात राहतो. तसेच तिळाचे सेवन टाईप २ च्या मधुमेहासाठी लाभदायक ठरते.
सुदृढ हृदयासाठी
जेव्हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा हृदयासंबंधित रोग होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी तिळाचे सेवन लाभदायक ठरू शकते. तिळाच्या दाण्यात सेसमोल नावाचे घटक असते ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी- इन्फ्लेमेटरी प्रभाव अधिक असतो. तसेच तिळामध्ये अँटी-एथेरोजेनिक गुणही आढळतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत मिळते.
कॅन्सरपासून संरक्षण
तिळामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. तिळातील आढळणारे अँटी-कॅन्सर आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण हे कॅन्सरच्या धोक्यापासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या एका शोधानुसार, तिळातील लिग्नान्सवर अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार अँटीएजिंग, अँटीकॅन्सर, अँटीडायबिटीस, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट्स गुणांसाठी तीळ चांगलेच फायदेशीर ठरतात. लक्षात ठेवा की, तिळाचे सेवन हे कॅन्सरचा आजार होऊ नये यासाठी मदत करू शकतो. हा कॅन्सरवरील उपाय नाही.