लोकशाही न्यूज नेटवर्क
वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना आव्हाने शिवारातील संत सावतानगर येथे घडली. त्यांच्या घरातून चोरटयांनी रोख १० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील आव्हाने शिवारातील संत सावतानागरात रत्नाबाई पाटील या राहत असून, दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वक्ता घराला कुलूप लावून जळगावातील राजनगर येथे वडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख १० हजार रुपये, सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दि १८ रोजी रत्नाबाई पाटील घरी आल्या त्या वेळी हा प्रकार समजला. त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.