महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

राष्ट्रवादी, शिवसेनेचे गुऱ्हाळ सुरुच : भाजपतर्फे प्रचाराची तयारी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजपाचे बरेच उमेदवार जाहीर करुन प्रचाराची तयारी देखील सुरु केली असतांना महाविकास आघाडीला मात्र अद्यापही उमेदवार मिळेनासे झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर या पक्षाची हाल अपेष्टा अद्यापही संपत नसल्याचे दिसून येत आहे. रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी महाविकासला अद्यापही उमेदवार गवसले नसल्याने त्यांचे श्रेष्ठी सक्षम उमेदवाराचा शोध घेत असले तरी कुणीही हाती मशाल आणि तुतारी घेण्याच्या तयारीत नाही.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला उमेदवार भाजपाने दिले असून त्याचे समर्थन होत आहे. बेटी बचाव बेटी बढावचा नारा देणाऱ्या भाजपाने महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करुन दिल्याने त्यांच्याबद्दल महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर सहानुभूती निर्माण झाली. महाविकास आघाडीकडूनही महिला उमेदवार देण्यावर भर दिला जात असतांना त्यांना मात्र उमेदवारच गवसत नाही.

जळगाव मतदारसंघात भाजपाच्या स्मिताताई वाघ यांच्या विरोधात उद्धव ठाकच्या शिवसेनेकडून ॲड. ललिता पाटील यांचे नाव आघाडीवर असल्या तरी त्यांना अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. ॲड. ललिता पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू नये यासाठी काही पदाधिकारी खोडा घालत आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा शोध घेतांना राष्ट्रवादीच्या नाकेनऊ आले आहे. ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारीची गळ घातली गेली असतांना त्यांनी मात्र स्पष्ट शब्दात नकार दिल्याने राष्ट्रवादीसमोर समस्या निर्माण झाली आहे.

समन्वयाचा अभाव

शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकची शिवसेना या निवडणुकीला सामोरे जात असल्या तरी त्यांच्यासमोर समस्यांचे पाढेच जास्त आहे. कार्यकर्ते कमी आणि पदाधिकारी जास्त अशी अवस्था असल्याने कुठेही समन्वय दिसून येत नाही. प्रत्येक इच्छुक आपलेच ढोल बाजविण्यात मग्न दिसून येत असून कुणालाही पक्षाचे हित जोपासायचे नाही हे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. समन्वयाच्या अभावामुळेच अडचणींमध्ये वाढ होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.