नंदुरबारचे आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई : नंदुरबारमधील ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे – गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख – चंद्रकांत बोडारे यांनीही शनिवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात जाणे पसंत केले होते. ठाकरे गटातून शिंदे गटात ‘ऑऊटगोईंग’ सुरुच असून बुधवारपर्यंत आणखी काही नेते शिंदे गटात येतील, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत आमश्या पाडवी यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून पाडवी यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत काम करत आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांच्याविरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.

आता नंदुरबारमध्ये पाडवी लोकसभेसाठी पुन्हा एकदा मैदानात असण्याची शक्यता होती. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस याची आघाडी असल्यामुळे आमश्या पाडवी यांना काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करावा लागला असता. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन आमश्या पाडवी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सन २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेत पाडवींना उमेदवारी दिली होती, असे असले तरी आमश्या पाडवींनी शिंदे गटात जाणे पसंत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.