समाजकार्य करतांना नफा तोट्याचा हिशोब बाजूला ठेवा !

0

लोकविचार विशेष लेख 

प्रा. रमेश लाहोटी 

समाजकार्याची आवड उपजतच असावी लागते. परंतु काही लोक समाजात प्रतिष्ठा मिळावी व त्याचा लाभ आपल्या व्यवसायाला मिळत रहावा, या सुप्त भावनेतून करीत असतात. त्यातील काही अति व्यवहारी माणसांचा डोळा या समाजकार्यातून मिळणार्‍या व्यक्तिगत लाभावर असतो.  त्याचा हिशोब ते मनात जोडत असतात. काही लोकांचा कल त्याचाही पुढे असतो.  केलेल्या समाजकार्यातून आपल्या खिशाला काही चाट तर बसणार नाही याची ते कटाक्षाने काळजी घेतात. समाजाचे हित साधतांना किंवा संघटनेच्या माध्यमातून गरजूंना मदत करतांना आपल्या खिशाला काही झळ तर पोहोचणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेत असतात.

वास्तविक समाजकार्य आपण निस्वार्थ भावनेने केले पाहिजे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त हेतूने करावयास हवे. त्यात सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न दिसावयास हवा. अशावेळी आपण केलेल्या समाजकार्यातून आपला व्यक्तिगत फायदा किती झाला व तोटा किती सहन करावा लागला हा विचारदेखील मनात डोकावू नये.  कारण समाजकार्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्ची पडतो. हाच वेळ जर आपण आपल्या व्यक्तिगत व्यवहारासाठी वापरला असता तर निश्चितच आपल्या उत्पन्नात भर पडली असती.

समाजकार्यात वेळेसहित बरेच परिचयही करावे लागतात.  त्यातही आपण जर पदाधिकारी असलो तर परिचयाचा सारा भार आपल्या खांद्यावर येऊन पडतो आणि हा भार मुकाट्याने सोसावा लागतो. याशिवाय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा उभारू न शकल्यास गरजेनुसार सदस्य म्हणून आपल्यालाही आर्थिक मदतीचा हात पुढे करावा लागतो व शक्य होईल तितकी मदत करावी लागते.

समाजकार्यासाठी खर्ची पडणारा आपला बहुमूल्य वेळ, उचलावा लागणारं  परिश्रमाचं ओझं आणि गरजेनुसार करावी लागणारी आर्थिक मदत हा सर्व दृश्य स्वरूपातील खर्च आहेत.  ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो त्यामुळे त्या खर्चाची जाणीव आपणास लगेच होते.  त्यामुळे आपल्या व्यवहारी मनात लगेच चल होतो.  कधी कधी घरातूनही विरोध पत्करावा लागतो.

उलटपक्षी समाजकारणातून होणारे फायदे हे अदृश्य स्वरूपातील असतात.  ते किती प्रमाणात होतील याचा अंदाज बांधता येत नाही.  समाजकार्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपणास मानसिक शांती मिळते.  जी बाजारात पैसे खर्च करून मिळत नाही.  भौतिक सुख आपणास हवे असल्यास ते बाजारात जाऊन खरेदी करता येते मानसिक सुखासाठी मात्र समाजकार्याची कास धरावी लागते. आपल्या सेवाकार्य पुढे जेव्हा गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलते किंवा त्यांचे अश्रू पुसले जातात ते बघूनच आपल्याला मानसिक शांती मिळते.  मानसिक शांती दिसत नाही ती फक्त अनुभवता येते सामाजिक कार्यात बरेच लोक आपल्या संपर्कात येतात.  त्यामुळे आपल्या ओळखी वाढतात.  या ओळखीमुळे आपली जी कामे पैसे खर्च करून होत नाही.  ती सहजगत्या होऊन जातात व त्यासाठी वेगळा पैसाही खर्च करावा लागत नाही. समाज कार्यामुळेच आपला जनसंपर्क वाढतो.  मित्रपरिवार वाढतो.  त्याचा अप्रत्यक्ष फायदा निश्चितच आपण करीत असलेल्या व्यवसायाला होतो.

एका ख्यातनाम उद्योगपतीने आपल्या आत्मचरित्रात हे खुल्या दिलाने कबूल केले आहे की, ‘समाजकार्य यह घाटेका सौदा नही है’.  म्हणूनच माझेही हेच सांगणे आहे की, समाज कार्य निस्वार्थ भावनेने करा त्यासाठी नफा- तोट्याचा हिशोब बाजूला ठेवा..

Leave A Reply

Your email address will not be published.