लागेबांधे आयुक्तांचे की नगरसेवकांचे
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड हटावसाठी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी तीन दिवसांचे साखळी उपोषण केले. शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे आश्वासनानंतर शनिवारी हे उपोषण त्यांनी मागे घेतले. डॉ. अश्विन सोनवणे यांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील तिन्ही पक्षाचे नगरसेवक एकवटले आहेत. आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे विशिष्ट लोकांची लागेबांधे आहेत. त्यांचीच कामे केली जातात, इतरांची कामे होत नाही, अशा प्रकारे डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर आरोप केला जातो आहे. शहरातील विकास कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे प्रभागातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील रस्त्यांची दुर्दशा तसेच रस्त्यातील खड्डे दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष नसल्याने अस्वच्छता पसरली आहे, आदी आरोप डॉ. अश्विन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केले. बदली होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालूच राहील असे डॉ. अश्विन सोनवणे यांनी स्पष्ट केले होते. तथापि शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना उपोषण स्थळी जाऊन आश्वासन दिल्यानंतर डॉ. अश्विन सोनवणे यांनी उपोषण मागे घेतले. महापालिकेचे यापूर्वी आयुक्त डॉ. गेडाम यांचे विरोधात 2004 साली अविश्वास प्रस्ताव आणला होता. आता आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराची वाहतात सुरू आहे. जळगाववासी नागरी त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा वर्षात नगरसेवकांनी आवाज का उठविला नाही? शहर स्वच्छतेचा ठेका वॉटर ग्रेस कंपनीकडे पाच वर्षांपूर्वीच दिला. कचऱ्यात दगड टाकून वजन वाढवण्याचे प्रताप वॉटर ग्रेस कंपनीने केले. रंगेहात त्यांना पकडण्यात आले. तथापि गेल्या पाच वर्षात नगरसेवकांनी वाटर रेस कंपनीच्या विरोधात कडक भूमिका का घेतली नाही? यामागचे इंगित काय? आयुक्त गायकवाड यांच्या कार्यकाला अवघे वर्षी पूर्ण झालेले नसताना आपल्या अकार्यक्षमतेचे खापर आयुक्तांवर फोडण्यामागचे कारण सर्वसामान्य नागरिकांना कळत नाही, असे डॉ. अश्विन सोनवणे सह सर्व नगरसेवकांना वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज म्हणावा लागेल. अनेक नगरसेवक महापालिकेत ठेकेदार बनलेले आहेत. या ठेकेदारांकडून झालेल्या कामांच्या दर्जाबाबत ओरड आहे त्याचे काय? जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाले होते. खोटेनगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतच्या चौपदरीकरणात केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा आणि त्यानंतर कालिंका माता ते तरसोद पर्यंत झालेला महामार्ग रस्ता उन्हाळ्यात ठेकेदारांनी केला आणि अवघ्या चार महिन्यात पहिल्याच पावसात रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्याला ठेकेदार जबाबदार नाही का? या महामार्गाचा ठेका घेणारे ठेकेदार कोण? त्यांच्यावर कारवाई होईल का? आपलेच दात आणि आपलेच ओठ. शहरातील काही रस्त्यांच्या झालेल्या कामांच्या दर्जाबाबत प्रत्यक्ष काम सुरू असताना जागरूक नागरिक म्हणून डॉ. राधेश्याम चौधरी यांनी फोटोसह माध्यमातून प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. कालिंका माता ते तरसोद रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महामार्गावरील प्रचंड वाहतूक आणि त्यावरून एमआयडीसी परिसरातील कामगार आपला जीव मुठीत घेऊन ये जा करतात. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी एकदा फेरफटका मारावा म्हणजे त्यांच्या निदर्शनास येईल…
लोकप्रतिनिधींनी नगरसेवक अथवा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यापैकी कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही. परंतु नगरसेवक आणि आयुक्त यांचे जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याचा बारकाईने अभ्यास केला तर एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला तर ती शिस्त गैरसोयीचे वाटल्याने अधिकाऱ्यांवर अकार्यक्षमतेचे आरोप लावणे सोपे असते. आयुक्त विद्या गायकवाड यांनी लावलेली आर्थिक शिस्त लोकप्रतिनिधींना नको आहे काय? डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर विशिष्ट लोकांची लागेबांधे असल्याचा आरोपा संदर्भात डॉ. विद्या गायकवाड म्हणतात की, अकाउंट मधून कामाची यादी पहा त्यातून लागेबांधे कोणाचे आहेत हे लक्षात येईल. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांवर तुटून पडणारे नगरसेवक अशावेळी मात्र सर्व मतभेद विसरून एकत्र येतात. यामागे शुद्ध हेतू आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. यापूर्वी महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली होती, तेव्हा ठेकेदारांची बिले निघत नाहीत म्हणून ठेकेदार कामे करण्यास तयार नव्हती, हे खरे नाही काय? आता आपल्या प्रभागातील कामाची यादी मोठ्या प्रमाणात आयुक्तांकडे दिली तर त्या यादीत सर्व कामे करणे शक्य आहे का? आपली कामे करण्यासाठी प्रशासनावर नगरसेवकांवर दबाव आणला जातो. दबावाने कामे करून घेतलेल्या नगरसेवकांच्या प्रभागाची यादीच देता येईल. अनेक प्रभागात विकास कामे रखडले आहेत. गेल्या 30 वर्षापासून भुसावळ रोडवरील खेडी बुद्रुक परिसराची खेड्यापेक्षाही वाईट अवस्था आहे. खेड्यामध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्ते झाले आहेत. खेडी बुद्रुक मध्ये सर्वत्र चिखलाचे रस्ते. गटारी नाही. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. खेडी हा भाग जळगाव महानगरपालिकेतील आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. खेडीमध्ये राहणारे नागरिक महानगरपालिकेचा टॅक्स भरत नाही का? याकडे महापौर आणि उपमहापौर यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असताना ते फिरकत देखील नाही. यावरून जनतेच्या प्रश्नाविषयी आमच्या लोकप्रतिनिधींना किती काळजी आहे हेच यावरून स्पष्ट होते. तथापि स्वार्थासाठी मात्र सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्र येतात. जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. तुकाराम मुंढे आमच्या नगरसेवकांना चालतील का? चालत असतील तर तशी एकमुखी मागणी शासनाकडे करावी…!