आयुक्त विद्या गायकवाडांवर अविश्वास ठरावाचा उडाला फज्जा

माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे स्वयंघोषित उपोषण आंदोलनाने पडले तोंडघशी : विशेष महासभेला नगरसेवक फिरकलेही नाही

0

 

लोकशाही स्पेशल

 

  • वैयक्तिक दबाव तंत्रासाठी स्वयंघोषित साकळी उपोषण

 

  • पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाची माहितीच नव्हती

 

  • भाजप श्रेष्ठींकडून उपोषण आंदोलन अविश्वास ठराव बाबत परवानगी घेतली नाही

 

  • पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे उपस्थितीत बैठकीचे सत्र

 

  • सत्ताधारी पक्षाची बदनामी होण्याच्या मंत्रीद्वयींच्या सूचनेमुळे अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची कारवाई

 

  • महापौर उपमहापौर यांनी उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला नसल्याचे केले स्पष्ट

 

  • आयुक्तांवरील अविश्वास ठरावासाठी बोलविलेल्या महासभेत आयुक्त विद्या गायकवाड यांचा खुलासा

 

  • कोरम अभावी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब

 

  • आगामी विधानसभा निवडणूक उमेदवारीवर डोळा ठेवणारे डॉ. अश्विन सोनवणेंचे स्वप्न भंगले

 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीसाठी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पुकारलेले साखळी आंदोलन आणि आयुक्तांवर सादर केलेल्या अविश्वास ठरावाचा फज्जा उडाला. काल मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी बोलविण्यात आलेल्या मनपाच्या विशेष महासभेला नगरसेवक फिरकले देखील नसल्याने विशेष महासभा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, प्रभागातील विकास कामांकडे दुर्लक्ष करतात, विशिष्ट लोकांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत, शहरातील मूलभूत समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे, शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, शहर स्वच्छतेचे ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीवर त्यांचा वचक नाही, गटार तुंबलेल्या आहेत, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे, शहरात फेरफटका मारू समस्या सोडवण्याऐवजी कार्यालयात बसून कारभार करतात अश्या आरोप व मागण्यांचे निवेदन तयार करून डॉ. अश्विन सोनवणे यांनी तीन दिवस साखळी उपोषण केले. डॉ. अश्विन सोनवणे हे भाजपचे नगरसेवक असल्याने साखळी उपोषण आंदोलन हे भाजपचे आहे, असे भासविण्यात आले. सत्ताधारी पक्षाच्या माजी उपमहापौरांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप, शिंदे शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उपोषण स्थळी जाऊन पाठिंबा दिल्याचे आणि ५५ नगरसेवकांच्या निवेदनावर सह्या असल्याचेही सांगण्यात आले. आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला गेला. यावरही ५५ नगरसेवकांच्या सह्या असल्याचे सांगून निवेदन महापौरांकडे देण्यात आले. त्यानुसार महापौर जयश्री महाजन यांनी विशेष महासभा मंगळवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी बोलविली होती.

विरोधी पक्षनेते महापौर जयश्री महाजन यांचे पती सुनील महाजन यांनी सुद्धा उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या नगरसेवकांचाही डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीसाठी पाठिंबा होता, हे स्पष्ट दिसून आले. महापौर जयश्री महाजन यांनी मात्र ‘उपोषण आंदोलनाला माझा पाठिंबा नव्हता’ हे नंतर जाहीर केले हे विशेष…

 

स्वयंघोषित आंदोलन

माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी भाजपच्या परवानगीशिवाय हे स्वयंघोषित आंदोलन केले असल्याचे बिंग फुटले. सोमवारी मंत्री द्वयांच्या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले. डॉ. सोनवणे यांनी उपोषण आंदोलनाला सुरू केले आहे. याची मंत्रीद्वयींना कल्पना देखील नव्हती. राज्यातील सत्ताधारी पक्षातर्फे अशा प्रकारच्या आंदोलनामुळे बदनामी होईल म्हणून हा अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची सूचना मंत्री महोदयांनी केली असल्याचे कळते. अशात आयुक्तांची बदली होईपर्यंत साखळी उपोषण चालूच राहील, अशी गर्जना डॉ. अश्विन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तथापि तिसऱ्या दिवशी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी उपोषण स्थळी जाऊन आश्वासन दिल्याचे सांगून हे स्वयंघोषित आंदोलन डॉ. सोनवणे यांनी मागे घेतले.

महानगरपालिकेचा कारभार नगरसेवकांच्या मनाप्रमाणे होत नाही. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शिस्त लावली. ही शिस्त प्रत्येक नगरसेवकांना खूपत होती. प्रभागात नगरसेवकांची कामे होत नाही, असा एक आरोप आयुक्तांवर करण्यात येतो. तथापि नगरसेवकांच्या कामांची यादी सादर करण्यात येईल, तसेच अकाउंट बघितल्यानंतर त्यात किती सत्यता आहे, हे स्पष्ट होईल असा खुलासा आयुक्तांनी केल्यावर सर्वांचे धाबे दणाणले.

 

स्वार्थासाठी दबावतंत्र

जळगाव शहर महानगरपालिकेत सर्वच नगरसेवक ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने तीन ठेकेदारांना विकासाच्या कामांचा ठेका मिळतो. ते प्रमुख ठेकेदार कोण? याची डॉ. अश्विन सोनवणेंसह सर्वच नगरसेवकांना माहिती आहे. ठराविक ठेकेदारांनाच काम कसे मिळते? याबाबतही अधिक सांगण्याची गरज नाही. आयुक्तांवरील अविश्वास ठरावाचा कसलाही सार्वजनिक हेतू नाही, अथवा शहर विकासाची तळमळ नसून केवळ स्वार्थ त्यामागे दडलेला असल्याने या अविश्वास ठरावाला वरिष्ठांकडून संमती मिळाली नाही. पक्षाची बदनामी होऊन आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल म्हणून वरिष्ठांकडून तंबी देण्यात आल्याने अविश्वास ठराव बारगळला आणि त्यातून डॉ. अश्विन सोनवणे हे उघडे पडले.

 

लोकशाही स्पेशल

धों. ज. गुरव

सल्लागार संपादक

Leave A Reply

Your email address will not be published.