मनपा प्रशासनावर शहरवासीयांची नाराजी

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन तीन महिने होत आले. मनपावर प्रशासकांच्या नियुक्तीनंतर कामकाज गतिमान होईल ही अपेक्षा होती. तथापि ती अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने विकास कामांना खेळ बसतो आहे, असा समज होता. परंतु लोकप्रतिनिधी राजवट संपुष्टात आले. त्यानंतर अधिकारी राज निर्माण झाले आहे. निदान नगरसेवक असताना त्या त्या प्रभागात नागरिक आपल्या नगरसेवकांना भेटून फोन करून आपल्या व्यथा मांडत होते. काही अंशी त्या समस्या सुटतही होत्या. आता अधिकारी मंडळी नागरिकांच्या तक्रारींना अक्षरशा केराची टोपली दाखवत आहेत. भुसावळ रोडवर असलेल्या खेडी मधील पेट्रोल पंपा समोरील डीपी रोडला मंजुरी मिळून तीन वर्षे उलटून गेले. रस्त्याच्या मध्यभागी असलेले अतिक्रमण काढण्यासाठी अनेक महिने अतिक्रमण विभागाने टाळाटाळ केली. रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून खेडीवासीय नागरिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांना भेटून निवेदन दिले. तोंडी मागणी केली. तेव्हा ते अतिक्रमण हटले की कामाला सुरुवात होईल असे सांगून टाळाटाळ करायचे. अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांना भेटून सदर अतिक्रमण काढण्याची मागणी केली तर अनेक कारणे पुढे करायचे. अतिक्रमण काढल्यावर पावसाळ्याचे कारण पुढे करून रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल, असे सांगण्यात आले. आता पावसाळा संपला, दसरा दिवाळी पण संपली, परंतु रस्त्याच्या कामाला अद्याप मुहूर्त सापडत नाही. खेडी मध्ये राहणारे सर्व रहिवासी हातावर पोट भरणारी मंडळी आहेत. दिवसभर काम केल्यानंतर आपल्या कुटुंबाचे गुजारण होते. त्यामुळे नगरपालिकेच्या कार्यालयात वारंवार जाणे त्यांना शक्य नाही. त्यासाठी वेळ काढणे त्यांना जमणारे नाही. वेळात वेळ काढून काही मंडळींनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपले म्हणणे मांडले. परंतु त्यांना वाटण्याच्या अक्षता अधिकारी देतात. बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग तसेच नगर रचना विभाग यांच्यात आपापसात समन्वय नाही. एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार केला जातो. मनपा प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड या प्रामाणिक अधिकारी असल्या तरी आपल्या अधिकारी वर्गाकडून त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही. महानगरपालिकेचे पर्यायाने जळगाव शहरातील नागरिकांचे सेवक आहे, असे अधिकारी समजतच नाही. आपण जी कामे करतो म्हणजे उपकार करतो अशी त्यांची भावना असते. त्यामुळे जळगाव वासिया नागरिक प्रशासनावर प्रचंड नाराज आहेत. सुंदर शहर, स्वच्छ शहर, हिरवेगार शहर ही संकल्पना अमलात यायची असेल तर अधिकारी वर्गाने शहरवासी यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. तशी भावना अधिकाऱ्यांमध्ये तसू भरही दिसून येत नाही.

खेडी मधील डीपी रोडच्या कामासंदर्भात शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची सहा महिन्यांपूर्वी भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. तेव्हा राजू मामा भोळे यांनी आमदार निधीतून हा डीपी रोड करतो आणि त्याचे तातडीने काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु सहा महिने उलटले तरी आमदार महाशयांकडे या रस्त्याच्या संदर्भात कसलीही हालचाल झालेली दिसत नाही. परंतु 40 कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी मंजूर करून आणण्याची घोषणा मात्र केली गेली. या 40 कोटीच्या निधीतून एक महिन्याभरात रस्त्यांची कामे सुरू होतील असे सांगून शहरवासी यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. वर्षभरात विधानसभेची निवडणूक येईल तेव्हा जळगावकर नागरिक मतदानातून उत्तर देतील. तेव्हा आमदार महाशयांना पश्चाताप होईल. असो… सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी डॉक्टर विद्या गायकवाड यांनी खरे उतरावे. त्यासाठी शहरवासीयांची नाराजी दूर करून कामकाज गतिमान पद्धतीने व्हावे हीच अपेक्षा…!

Leave A Reply

Your email address will not be published.