क्रीडा संकुल जलतरण व्यवस्थापन बेपर्वाईचे

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलाव अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव जळगावकरांच्या सोयीचे असले तरी येथील जलतरण समितीचा गलथान कारभारामुळे ते नेहमीच गैरसोयीचे ठरले गेले. सदर जलतरण तलाव सुरू झाल्यापासून २००९, २०१२ आणि २०२३ या सालात तीन तरुणांचा बळी गेला. सदर जलतरण तलावासाठी व्यवस्थापनाकडून ज्या सोयी सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे त्या नसल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तिन्ही तरुणांचा मृत्यू झालेला आहे. व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे दिनांक १८  जून २०२३ रोजी सलमान बागवान या तरुणाचा मृत्यू झाला. 18 जून रोजी सायंकाळी सलमान बागवान हा तरुण बुडत असताना जीवरक्षकाकडून तडफेने आणि तातडीने कारवाई केली असती तर सलमान बागवानचा जीव वाचू शकला असता. परंतु जीवरक्षकांकडून तातडीची कारवाई करण्यात विलंब झाल्याने सलमान बागवानचा मृत्यू झाला. त्यामुळे सलमान बागवानच्या मृत्यूला पूर्णपणे क्रीडा समितीचे जलतरण व्यवस्थापन जबाबदार आहे. १८ जूनला सलमान बागवानचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता. परंतु आपल्या प्रशासनाचे हे दुर्दैवच आहे की, कुणीतरी मागणी करावी, आंदोलन करावे त्यानंतरच गुन्हा दाखल केला जावा. हा प्रकार कशासाठी? उलट कोणाच्या तक्रारी शिवाय पोलिसांनी आरोप सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला असता तर, पोलीस प्रशासनाची प्रतिमा उजळली असती. परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील असल्याने पोलीस प्रशासनाकडून चालढकल झाली असे म्हटले जाते. जर सदर जलतरण तलाव शासना ऐवजी खाजगी मालकीचे असते तर मागचा पुढचा विचार न करता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली गेली असती. एवढेच नव्हे तर त्या खाजगी मालकाला नको ती हरास्मेंट पोलिसांकडून झाली असती. अश्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु इथे मणियार बिरादरीच्या १०० जणांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनवर जाऊन सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन द्यावे लागले, हे दुर्दैव म्हणावे लागेल. शेवटी जनतेच्या दबावाला बळी पडून का होईना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधितांवर दाखल झाला हे चांगलेच झाले..

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल हे शासनाचे असल्याने त्याचे अध्यक्ष क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि उपाध्यक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल हे आहेत. त्यामुळे या जलतरण तलावातील तरुणाचा मृत्यू म्हणजे शासनाच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण करणारा आहे. जळगाव शहरात सध्या महापालिकेचे एक, एकलव्यचे दुसरे आणि क्रीडा समितीचे हे तिसरे जलतरण तलाव आहे. महापालिकेच्या जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षापासून आहे, पण तेथे एकही दुर्घटना घडलेली नाही. गेल्या चार पाच वर्षापासून खानदेश कॉलेज एज्युकेशनचे एकलव्य जलतरण तलाव व्यवस्थित चालू आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव येथेच गेल्या १२-१३ वर्षात तीन जणांचा मृत्यू होतो, त्या कारणाचा शोध घेऊन त्या दुर्घटना होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घ्यायला नको का? जलतरण तलाव चालवण्यासाठी योग्य ठेकेदाराला दिले जाते का ज्या अटी आणि शर्ती असतात त्या ठेकेदारांकडून पडल्या जातात का? संबंधित शासकीय यंत्रणेकडून काहीतरी काळबेर झालं असल्याशिवाय अशा घटना घडणे शक्य आहे का? ठेकेदारांकडून जे जीवरक्षक नेमले आहेत ते त्या कसोटीला योग्य आहेत का? जलतरण तलावात बॅच जेव्हा पोण्यासाठी उतरते तेव्हा हे जीवन रक्षक कुठे होते? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी संबंधित क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे का? त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? कारण ठेकेदाराचा कालावधी संपला असताना बेकायदा त्याच ठेकेदाराकडे काम सोपवण्याचे कारण काय? या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून क्रीडा मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा शासन बदनाम होणार आहे.

सदर सलमान बागवान या मयत तरुणाच्या कुटुंबीयांना सहानुभूती म्हणून शासनातर्फे काही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. मयत सलमान बागवानच्या कुटुंबीयांना त्याचा मुलगा परत मिळणार नाही, परंतु त्यांना सहानुभूती म्हणून तातडीने ही मदत जाहीर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील सदर जलतरण तलावाची खोली पाच फुटाने कमी करण्याचे आदेश २००९ सालीच शहा नामक तरुणाच्या मृत्यूनंतर दिले असताना ती खोली कमी न करण्यामागचे कारण काय? सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आता तरी होईल का? तसेच झाले तरच सदर जलतरण तलावावर लोक बिनधास्तपणे पोहण्यासाठी जातील. अन्यथा संशयाचे भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसेल, हे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.