खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा निधी प्राप्त होण्याआधी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी वृत्तपत्रातून मोठ्या जाहिराती देऊन स्वतःची टिमकी वाजवून घेतली. तीन महिने उलटले. शंभर कोटीच्या निधीतून विविध प्रभागात 23 सिमेंटचे रस्ते बनविणार असल्याची यादी तयार करण्यात आली. महानगरपालिकेच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे सर्व सिमेंटचे रस्ते करणार असल्याचे जाहीर झाले, परंतु माशी कुठे शिंकली?  हे कळत नाही. पावसाळा सुरू झाला, पण सिमेंटच्या रस्त्याच्या एकही कामाला सुरुवात झाली नाही. ‘सिमेंटचे रस्ते असल्याने पावसाळ्यात सुद्धा रस्त्याची कामे चालू राहतील’, असे समर्थन करण्यात आले. तथापि पावसाळ्यात प्रत्यक्ष सिमेंटचे काम करणे सुद्धा सहज शक्य नाही. चार महिने पावसाळ्यात डांबरी रस्त्याचे काम पूर्ण बंद असते. तसेच सिमेंट रस्त्याचे नसले तरी फक्त सिमेंटच्या रस्त्याचे काम चालू हे सांगण्यासाठी ठीक आहे. ‘काम चालू आहे’ असे सांगून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार म्हणता येईल.

 

जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील खेडी या गावचे प्रथम नगरपालिकेत अंतर्भाव होऊन तीस वर्षे झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आता महापालिकेत अंतर्भाव झाल्यापासून एकही विकासाचे काम झालेले नाही. सर्वे नंबर 62 आणि सर्वे नंबर 63 मधील राष्ट्रीय महामार्गापासून गावात जाणारा डीपी रोड महापालिकेने वीस वर्षापासून मंजूर केला आहे. तथापि अद्याप पर्यंत डीपी रोडचे काम झालेले नाही. रस्ता होत नाही म्हणून गटारी बांधल्या जात नाही. घरातील गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांपासून सर्वे नंबर 62 आणि 63 मधील नागरिक या रस्त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु या नागरिकांची महापालिकेत दखल घेतली जात नाही. ‘या रस्त्यावर सात ते आठ अतिक्रमण असल्याने रस्त्याचे काम सुरू करता येत नाही’, असे कारण महापालिकेच्या बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगून नागरिकांच्या मागणीची जणू खिल्ली उडवली आहे. आता महिना उलटला. या रस्त्यावरची अतिक्रमणे काढली. तथापि रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही. हा रस्ता सुरू करण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पहावी लागेल? हे मात्र कळत नाही. आता तर पावसाळ्याचे कारण देऊन चार महिने चालढकल करण्यास त्यांना वाव मिळाला आहे…

 

महापालिका बांधकाम विभाग या रस्त्याचे काम सुरू करीत नाही, त्याचे कारण मात्र आता कळत नाही. शेवटी या भागातील रहिवासी नागरिक तसेच पत्रकार कॉलनीतील पत्रकारांनी मिळून शेवटी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची भेट घेऊन या रस्त्याबाबतची कैफियत मांडली. त्यावर राजू मामा भोळे यांनी स्वतःच्या निधीतून हा रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यालाही आता दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. तरी प्रगती शून्य आहे. 100 कोटी रस्त्याच्या निधीतून खेडीचा डीपी रोड मंजूर झाला आहे. त्या निधीतून हा डीपी रोड होणार असल्याचे सांगून टाळाटाळ केली. त्याआधी महामार्गावर अंधार असल्याने दोन चौकात हाय मास्टर लॅम्प बसवण्याचे आश्वासने आमदार भोळे यांनी दिले. अशा प्रकारचे आदेश त्यांचे स्वीय सहाय्यक यांना देण्यात आले. मे महिन्यात हे हाय मास्टर लॅम्प लागतील, असे सांगितले गेले. स्वीय सहाय्यक मार्फत हाय मास्टर लावण्याच्या जागेची पाहणी केली. परंतु त्यालाही अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. अशा पद्धतीने महापालिकेचा निष्क्रिय कारभार चालू आहे. आमदार राजू मामा भोळे यांनी सुद्धा नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. शेवटी खेडीचे नागरिक आता उपोषणाचा मार्ग अवलंबण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहेत…!

Leave A Reply

Your email address will not be published.