परनारी लालसा हे तर नरकाचे द्वार !

0

प्रवचन सारांश 06.10.2022

आयुष्यात काही गोष्टी करू नये असे सांगितले गेले आहे. परनारी व परधन यांची लालसा धरणे हे तर नरकाचे द्वार असते. धवलशेठ त्याच्या आयुष्यात श्रीपालच्या जहाज व त्यातील संपत्ती व त्याच्या दोन्ही पत्नी यांच्यावर वाईट नजर तो ठवतो. श्रीपालच्या पत्नींवर हक्क प्रस्तापित करायचा होता परंतु तसे घडले नाही. श्रीपालच्या पुण्यप्रभाव व नऊपद साधनेमुळे धवल शेठचे षडयंत्र कुचकामी ठरते. 1 महिन्यात तुम्हाला तुमचा पती श्रीपाल मिळेल अशी आनंदी बातमी श्रीपालच्या पत्नींना मिळते असे आजच्या प्रवचनात सांगितले गेले.

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र म.सा., डॉ. पदमचंद्र मुनी आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरु आहे. त्यात साधु संतांचे प्रवचन होतात. 1 ऑक्टोबर पासून नऊपद ओळी, आयंबील आराधना सुरू आहे. श्रीपाल चरित्र पठण व कथा प्रस्तूत होत आहे. डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर मुनी यांनी श्रीपाल कथा पुढे सांगितली.

आपल्या समोर काहीच नसलेला श्रीपाल अल्पावधीतच श्रीमंत झाला, भरीसभर सुशील पत्नी त्याला मिळाल्या. हे सगळे चांगले घडलेले पाहून श्रीपाल बद्दल धवलशेठ वाईट विचार करत असतो. मनात वासना, वाईट विचार येतात. मनात वासना निर्माण झाली व सोबत कुमती मित्राची साथ मिळाली तर चांगले न घडता वाईट घडेल. धवल व त्याचे मित्र मिळून श्रीपाल ह्याला समुद्राच्या पाण्यात उंचावरून ढकलून ठार करण्याचे ठरवतात. षडयंत्र यशस्वी होण्यासाठी श्रीपाल यांच्याशी जवळीक साधला जातो. धवलशेठ यांचे चार मित्र सोबत असतात त्या चौघांना धवलशेठ सगळे खरे खरे सांगतो. त्यापैकी तिघे मित्र सच्चे, चांगले मित्र असतात. जे चांगले असतात ते मित्राला चांगला सल्ला देतात. त्या तिघांनी धवलशेठने कुमार्ग अवलंबू नये असे सांगितले परंतु एक वाईट मित्र असतो. तो धवलशेठला या कामी मदत करतो. जहाजाच्या उंच मचानावर धवल शेठ असतात तिथे श्रीपाल याला बोलावले जाते व त्याला समुद्राच्या पाण्यात ढकलून दिले जाते. परंतु त्याच्या पुण्य प्रभावामुळे तो सुखरूप राहतो. आयुष्याची दोरी बळकट असेल तर कुणी ही काहीही वाकडे करू शकत नाही. श्रीपाल यांना समजले की धवलशेठने केलेल्या षडयंत्रामुळे आपण ह्या संकटाचा सामना करत आहोत.

संकटात, आनंदात श्रीपाल नऊ पद साधनेपासून दूर झाला नाही. त्याचे चांगले परिणाम, फळ देखील मिळतात हे खरे आहे. तो ज्या ठिकाणी आलेला असतो त्या राजकुमारीचा विवाह बाकी असतो. त्या नगरीत अनोळखी व्यक्ती अमुक झाडाखाली, अमुक तिथीला आला म्हणजे तो राजकुमारीचा पती होईल अशी भविष्यवाणी सांगण्यात आली होती. त्यानुसार राजकुमारी गुणमाला व श्रीपाल यांचा विवाह लावला जातो. गुणमाला श्रीपाल यांचा संसार सुरू झाला. तो आपला स्वतःचा परिचय सांगतो. श्रीपाल ह्याचे 250 जहाजे व त्याच्या दोन्ही पत्नी ह्या आपल्याच आहेत असा विचार धवलशेठ करू लागतो. श्रीपाल समुद्रात बुडाले ही वाईट बातमी त्याला पत्नींना समजते. जिचे पती नाही, पतीशिवाय संसार सुना होऊन जातो. या दुःखाच्या काळात धर्म आराधना केल्याने दुःख हलके होत असतो. दुःखातून सावरायचे असेल तर धर्म हा उत्तम उपाय आहे. श्रीपाल हाही नऊपद साधना करायचे तुम्ही ही साधना करा, असा सल्ला त्या दोन्ही राणींना दिला गेला. धवलशेठ अजून काय करतो, श्रीपाल व त्याच्या मालकीचे 250 जहाजे व त्याच्या दोन्ही पत्नी धवलशेठला मिळतात का ? श्रीपाल चरित्रात पुढे काय होते ह्या बाबत खुप मोठी उत्कंठा लागलेली आहे. ही कथा समजण्यासाठी पुढील कथासूत्र आणि प्रवचन अवश्य ऐकावे असे आवाहन करण्यात आले.

———□■□■ ———

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.