तरु शिखरावर कोकिळ कविने पंचमस्वर लावला …..!

0

राजव्दारी घडे चौघडा शुभत्कार जाहला
उठी उठी गोपाळा… उठी उठी गोपाळा …!

पहाट … भाग्यवंत पुण्यवंताची … पहाट नवचैतन्याची, पहाट सृष्टीला सौंदर्य प्रदान करणारी, ब्रम्हमुहूर्ताच्या सुमधूर भावविश्वाने उजळून निघणारी अशा या सुरम्य पहाटे भगवान गोपाळ कृष्णाला हळूवारपणे झोपेतून उठवतांना माता यशोदेने राजदरबारी भुपाळी म्हणावी. बालकृष्ण हसत हसत झोपेतून उठावेत म्हणून मातेनं सागराएवढया मायेनं या विश्वनियंत्याला जागे करावे रोज झोपतांना अंगाई गीत व उठवतांना भुपाळी रागातली तान छेडावी. उठल्याबरोबर मायेनं ओसंगा घ्यावा त्याआधी बालकृष्णाला कपाळावर मुका घ्यावा केवढं हे यशोदेचे पुण्य ….!

पहाट नित्य होते. पहाटे वातावरण शांत असतं. अशा शांत व रम्य पहाटे सत्वगुणांनी युक्त मानून लवकर उठतो. त्याआधी महिला उठतात सडासंमार्जन रांगोळया आणि अभ्यंग स्नानादी काम आटोपून देवदर्शन..! अशा रसरशीत पहाटे दूर कुठे तरी रेडिओवर भुपाळी लागावी. भुपाळी हे भगवंताचं महाकाव्य.. भुपाळीच्या स्वरांना संगीताचा साज चढला की मग ती भगवंताला निश्चित आवडते. पंडित कुमार गंधर्व भुप रागातल्या चाली गाणारे महान कवी या कविनं आपल्या सुरेल आवाजात भक्तिमय पहाटे म्हणावं :-

सागरतिरी ऋषीमुनिंचा वेदघोष चालला ।
धूप दीप नैवद्य असा हा उपचार जाहला ॥

भगवंताच्या उठण्याआधी काय स्थिती असते, याचे सुंदर वर्णन या भुपाळीत केलं आहे. राजदरबारी सनई चौघडयाचे स्वर घुमू लागतात. रस्त्यारस्त्यातून सडे टाकलेले त्यावर रांगोळया काढलेल्या आणि घराघरांमधून धूप दीप याचे सुगंध पसरलेले. लहान लहान पाऊले मंदिराकडे लगबगीनं जातांना या पायांमधील वाडे नुपूरांना लावलेले घुंगरुंचे झंकार रुणझुण रुणुझुणु एैकू येतात, मंदिराच्या गाभाऱ्यात घराघरातील देव्हाऱ्याजवळ देवांपाशी टाळांची किणकिण एैकू येते अशा या मंगलप्रसंगी कवी पुढे म्हणतो :-

घनवेळूंचे वाजवी मुरली । छान सुर लागला ॥
तरु शिखरावर कोकिळ कविने । पंचमस्वर लावला ॥

मुरली भगवंताला अष्टप्रधान नायिकांपेक्षाही, राधेहून ही अधिक प्रिय म्हणून तर या मुरलीनं भगवंताला मुरलीधर हे नाव धारण करायला लावलं. घनवेळूंची मुरली म्हणजे ती काही साधी मुरली नव्हती. आर्द्रा नक्षत्राच्या पावसानं चमचमत्या विजांनी कडाडत्या मेघांनी या धरणीवर आभाळमाया करावी आणि वेळूच्या बनात वाजदे फुटावेत मेघांनी वाजंत्री वाजवावी ती अशी की, कानठळया बसाव्यात. या वातावरणात मग बाबूंनी तरारते कोंब काढावेत मोठा झाल्यावर या बाबूंपासून जी मुरली बनते ती घनवेळूंची मुरली.. मग या मुरलीवर बोटं फिरवीत तीच्या तून धून निघावी या सुरांनी बालगोपांच्या गायी वासरांनी सूर समाधी घ्यावी चरण थांबवावं.. एकतानता लागावी आणि मग कोकिळेने काव्य गावं. कुहूकुहूंनी पंचमस्वर लावावा.. भारलेल्या मंतरलेल्या अशा भावसरिताने मग भगवंताला जागे करण्यासाठी भूपाळी म्हणावी 15 हजार वर्षापूर्वी व्दापार युगात भगवान कृष्णांनी बाललिला केल्या हरिविजय ग्रंथाच्या 3 ऱ्या अध्यायापासून ७ व्या पर्यंत श्रीधर कवीने या बाललिलांना शब्दांचा जो साज चढविला आहे तो अवर्ननिय असा आहे.

पहाटेची वेळ ज्यांना साधता आली त्यांना जीवनाची सुंदर व सुरम्य अनुभूती आली असं समजण्यास हरकत नाही. मी विद्यार्थी दशेत असतांना पहाटे साडेचारला उठत असे अशा दिवसांमध्ये रविवारी सुटीचा दिवस पहाटे 6 पर्यंत झोपायला मिळणार असा विचार करुन झोपलो. साखर झोपेत असतांना वडिलांनी जो रपाटा हाणला तो आजही आठवतो. शहरी संस्कृतीत पहाटे लवकर उठणारा खेडयातला माणुस त्या संस्कृतीशी अजूनही एकरुप का होऊ शकला नाही याचे एकमेव कारण म्हणजे पहाट …।

काही बिस्तरप्रेमी, झोपाळू पहाटे ११ वाजेपर्यंत झोपतात. खेडोपाडी अजूनही हे चित्र दिसत नाही. मानवी अवतारात येऊन भगवान कृष्णांनी कर्म, धर्म, वर्म पाळण्याचे जे संकेत दिले आहेत ते या भूतलावर अजूनही कटाक्षाने पालन होतांना दिसतात म्हणून सृष्टीचं हे चक्र त्याचे आज्ञेवरुन सुरु आहे. मानवाने अहंकाराचा त्याग करुन षडरिपूंना थोडं दूर सारलं तरी जीवन हे कसं निर्मळ स्वच्छ नितळ पारदर्शी होतं बघा…!

लेखन सेवा धर्म माणुस श्रवण भक्तिचा आस्वाद मानवाला निश्चित मनाने प्रभु चिंतनाची गोडी लावेल असा माझा स्वानुभाव आहे. म्हणून पहाटे लवकर उठून देवभक्तिचे काव्यप्रकार ऐकले तर मन दिवसभरासाठी प्रसन्न होते. नवविधा भक्तित श्रवण भक्तिचा महिमा अनन्यसाधारण आहे.

रमेश जे. पाटील
आडगाव ता. चोपडा
मो. 9850986100

Leave A Reply

Your email address will not be published.