सकळभुवनवासी भेट दे रामदासी I

0

करुणाष्टक- 15

जळचर जळवासी नेणती त्या जळाशी I
निशिदिन तुजपासीं चुकलों गुणरासी II
भूमिधर निगमांसी वर्णवेना जयासी I
सकळभुवनवासी भेट दे रामदासी II

लहान मोठ्या चुका या माणसाच्या हातून होत राहतात. त्यात वावगं असं काही नाही. ‘जो करतो व चुकतो तो माणूस’ अशी व्याख्याच आहे. पण त्याच्या उलट जे काही करत नाहीत व चुकत नाहीत ते ब्रह्म. आपण साधी माणस आहोत चुका या होणार. अगदी महान व्यक्तिमत्त्व घेतली तरी जवळून पाहिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एखादा अवगुण दोष राहतो मग ‘आपल्या हातून चुका होतात’ हे कबूल करायला हरकत नाही . पण कधीकधी या चुका आपण मान्य करीत नाही, त्याही पुढे जाऊन चुका आहेत असे वाटतच नाही.

समर्थांच्या दासबोधात ते लिहितात- आपण स्वतः स्वतःची स्तुती करू नये, लहान सहान गोष्टीत चुक करू नये, रस्त्याने खात खात जाऊ नये, विनाकारण शिव्या देऊ नये. आपल्याला हे कुठे दोष वाटतात ? कधीकधी आमचा स्वभाव असाच आहे व जगात असेच असायला हवं असं समर्थनही आपण करतो. खरंतर ‘उत्तम गुण आधी अंगी बाणावेत’ असे समर्थांना वाटते. मोठ्या चुका म्हणजे एक बायको वारली दुसरी करणे ठीक, पण पैशाच्या मोहात अडकणे, मुलगा व्हावा म्हणून नवस बोलणे बरं खूपच मुली झाल्या तर पुन्हा लक्ष्मी निघून जाते, मेव्हण्याला ब्राह्मण म्हणून जेवायला बोलावणे एवढा कंजूष पणा करणे, तारुण्याने उन्माद चढून जाणे अशा अनेक गोष्टी घडतात.

पण यातूनही आपण भक्तिमार्गाकडे वळलो तर आपल्या अपराधांना पोटात घालून तो आपल्याला जवळ घेतो यात शंका नसावी. समर्थ म्हणतात, जळचरांना कुठे पाण्याचे भय असते ? ते तर त्याचं जीवन असतं. राहायला पृथ्वी आहे पण प्यायला पाणी नसेल तर सर्वच प्राणिमात्रांचे जीवन अशक्यप्राय झाले असते. मासे, मगर, कासव, छोटे-मोठे जलचर प्राणी एक क्षणही पाण्याशिवाय जिवंत राहणार नाहीत. ते तडफडून मरतील. पृथ्वीचे मुळ पाणी आहे, पाण्याचे मुळ तेज आहे. पवनाहुन श्रेष्ठ परमेश्वर आणि परब्रम्ह.

समर्थांचा ‘रघुराया’ हा परब्रह्म परमेश्वर आहे. ते निसंदेहपणे म्हणतात रात्रंदिवस मी तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येक दिवशी काही चुका होतच राहतात. महान पापी आहे मी. पण तो पतितपावन असल्याने मला खचितच दुर लोटणार नाही. तुझ्याकडे केवळ गुण नाही तर गुणांच्या राशी आहे. चिद् रत्नांची तु खाण आहेस. तू धर्मसंस्थापक, भक्तवत्सल, दयानिधी, करुणासागर, षड् रिपुभंजन, दोषनिवारण, पतितपावन, भवभयहारक, सुखकारक वैराग्य वर्धक अखिलतिर्थाटण, पत्नीकव्रत, साम्राज्यराधीन, षड्गुणैश्व्यर्य, सत् चित् आनंद आहेस. तुझे वर्णन कसे करू ?

“भूमिधर निगमांसि वर्णवेना जयासि I”

शेष व वेद यांना सुद्धा तुझे वर्णन करणे अशक्य झाले. ‘स्वयं शेष मौनवाला’. तू असा कसा आहेस हे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. त्यापेक्षा एक क्षण तु भेट दे. मी प्रत्यक्ष अनुभव घेऊन माझे जीवन धन्य, कृतार्थ करून घेईल.

“सकळभुवनवासी भेट दे रामदासी” तो भगवंत चराचर सृष्टीचा निर्माता आहे. “सकळ कर्ता परमेश्वर” त्याने सर्व मांडणी केली आहे व सगळ्यांचा सांभाळ ही तोच करतो आहे. मानव चार लक्ष योनी, पशु वीस लक्ष, कृमी कटक अकरा लाख, आकाशात उडणारे जीव दहा लक्ष या अनंत देहांची मांडणी त्याने केली आहे. सकळ जीवांचा सांभाळ करण्याची सोयही त्याचीच आहे. वरील जे जे काही आहे तो त्याचाच चमत्कार व साक्षात्कार आहे. साखरेचा कण वाहून नेणारी छोटीशी मुंगी किंवा खत- माती वाहून नेणारा गाढव ही सारी त्याचीच रुपे आहेत. त्याचा वास सर्वांच्या ठायी आहे. तो व्यापक आहे.

अशा सर्वसत्ताधीश श्रेष्ठ अशा परमतत्वाला समर्थ आपल्या आर्त भक्तीतून साद घालत आहे म्हणून समर्थांच्या मागण्या फक्त वैयक्तिक नाही ते म्हणतात, “भेट दे रामदासी” रामदास हा काही विशिष्ट पंथ व विशिष्ट संप्रदाय एवढ्यापुरताच मर्यादित अर्थ नाही तर ती एक वृत्ती आहे. सर्वश्रेष्ठ अशी जीवननिष्ठा आहे किंवा उच्च जीवन मूल्य आहे. मी त्या रामाचा दास आहे. यात अपराधीपणा, दुर्बलपणा अभिप्रेत नाही तर माझ्या आराध्य दैवताला जिंकणारा आहे. त्याची किर्ती त्रैलोक्यात पसरवणारा आहे.

संपन्न व कणखर वृत्तीने ही भक्तांची मांदियाळी भूतलावर वावरणार आहे. केवळ भगवे वस्त्र, वाढवलेल्या जटा, गोपीचंदनाचा टिळा या बाह्य अंगाला इथे महत्त्व दिलं जाणार नाही. तर पृथ्वीतलावरचा जीव हा त्या परब्रह्माचा अंश असल्याने त्याची सेवा दासभावाने करणे व त्याच बरोबर देवांची सेवा करुन महत्व वाढविणे अशी अद्वितीय व्यक्ती अंतरंगात बाळगून हा समर्थभक्त पुढे चालत राहील.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.