बसस्टॉप वरील गप्पा…

0

लोकशाही विशेष लेख

लोकशाहीने संपन्न देश घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

“तात्या, आते कायं राजकारण रायेल से का हो? आथानं तोडा, तथा जोडा. डिजे वाजाडा अन आपला घोडा नाचाडा “. असं समदं व्हयी जायेल से.
“काय करस नाना, आपनच दिनं त्यास्ले मत, त्या करतस आपला घात”
आसी गत व्हयी जायेल से”
तुमी दोनी मनं ऐका,”यंदा नवी कपाशी लावाना टाईम यी गया, तरी मांगली कपाशी अजून घरमाच पडेल से, काय जमाना उना भो”.
बस स्टॉपवर, रावसाहेब तात्या उदानाना अन रामदास भाऊ यांच्या गप्पा चालू होत्या. वास्तव मांडणा-या त्यांच्या गप्पा, बसस्टॉपवर पान टपरी चालवणारा सुदाम, गुळाचा चहा विकणारा सोमाआप्पा, पोरांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतही तळमळ करणारा अरुण मास्तर व बरेच जण कान देऊन ऐकत होते.
ग्रामीण भागातील ही मनामनातली गोष्ट रोज रोज गावातील बसस्टॉपवर
लोकं ऐकायचे. चालू घडामोडी, ते राजकारण, तापमान, वातावरण,पर्यावरण, किर्तन ते तमाशा, शेती माती, नातीगोती, सुख दुःख, घात, अपघात ते नोटबंदी सगळी स्टोरी या गप्पांमधून ऐकता यायची. येणाऱ्या जाणाऱ्यांचाही चांगला टाइमपास, रावसाहेब, नामू दादा आणि उदानाना या तिघांच्या दिलखुलास गप्पांमधून व्हायचा.

तसे ते तिघे रिकामे नव्हतेच पण मोबाईल घेऊन दिवसभर चॅटिंग करत गोड, आंबट बघत त्यात डोकावून राहण्यापेक्षा, दिलखुलास गप्पा मारण्याचा त्यांना भारी हौस होती. म्हणून ते आपली शेतीची व वैयक्तिक कामे करुन फावल्या वेळेत गप्पा मारण्यासाठी बस स्टॉप वर यायचे.
आज त्यांच्या गप्पांच गाडी पुढे चालत चालत विविध प्रकारच्या बातम्या, राजकीय नेत्यांच्या एकमेकांविरुद्धच्या टिपणीवरुन ,जनतेच्या प्रचंड रोषातून ज्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये अनेक पक्षी प्राणी व इतर गोष्टी राजकारणात कसे येतात हा होता.
“नाना, पुढारीस्नी, लयीच प्राणी पक्षी राजकारणमा आनेल सेतस”.
“कसं काय हो रावसाहेब” ?
“आहो बातम्यांमध्ये ते बरेच जण बरळतात की घोडेबाजार होणार, पोपटमेला, मैनामेली, कुत्र्याची औलाद, डुकरं, आम्ही ज्या सापांना दुध पाजलं तेच आज आम्हाला दंश करताय,
तो आमचा ढाण्यावाघ आहे. गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार, विरोधकांनी गाढवासारखे कुठेही उकीरडे हुंगू नये. निट अभ्यास करुन बोलावे. असा गयरा प्राणी या राजकाणी लोके राजकारणमा लयी उनात! काय उदानाना, खर से ना”.
“रावसाहेब, तुमनं बोलनं एकदम रोखठोक से.पन एक सांगू का प्राणी, पक्षी संगे, भाजी, खाद्यपदार्थ, धातू अन्न धान्य यास्ले पन राजकारणमा आनेल से”.
“ते कसं काय”?
नामूदादा देखा, “समोसेमे आलू, धुतल्या तांदळाचा, फुटकं वांग, विरोधकांची डाळ शिजली नाही,
आमचा माणूस म्हणजे 24 कॅरेट अस्सल सोनं, खणखणीत नाणं. या असा गयरा शब्द राजकारण मा येई जायेल शेतस”.
बस स्टॉप वरील बरेच जण या गप्पा ऐकत होते. राजकारण्यांनी राजकारणात प्राणी, पक्षी, धातू अन्नधान्य, डाळी, विविध भावभावना आणल्यात पण या सुंदर देशातील कॉमन मॅन च्या,सामन्य माणसांच्या समस्यांना वाचा फोडून, ग्रामीण लोकजीवन समृद्ध करुन,लोकशाहीने संपन्न देश घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असा सुंदर विचार मांडत रावसाहेबतात्या, नामू दादा आणि उदानाना यांनी , सोमाआप्पाच्या टपरीवरील गुळाचा चहा पिऊन गप्पांचा गोड शेवट केला.

एकनाथ ल. गोफणे
चाळीसगाव
मो. 8275725423

Leave A Reply

Your email address will not be published.