बरेच दिवस टिकणारी चविष्ट खरवस वडी

0

खाद्यसंस्कृती विशेष

खरवस म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच खायला आवडते. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासुन खरवस बनवता येतो. अगदीच लवकर पाहिजेत असेल तर लगेच आणि लवकर पण बनवता येतो. ते कसे काय?  सांगते.. चिकाचा खरवस हा एक पारंपरिक पदार्थ आहे. वेगवेगळ्या राज्यात, जिल्ह्यात तसेच वेगवेगळया गावांत बनवायच्या पध्दती थोड्याफार वेगळ्या असतीलच यात काहीच शंका नाही. खरवसपासून नुसत्या वड्या किंवा बर्फी बनवतात असे नाही, लाडू देखील बनवतात. गायीने किंवा म्हशीने नवीन पिल्लास जन्म दिल्यास त्यास गाय, म्हैस व्याली असे म्हणतात. त्या दिवसापासून १० दिवस जे दुध मिळते त्यास चिक असे म्हणतात. हे दूध खूप घट्ट असते. म्हणून यापासून खरवस बनवतात.

तसेच गायीच्या दुधात लो फॅट्स असतात. म्हशीच्या दुधात फुल्ल फॅट्स असल्यामुळेच शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात.पुर्वीच्या काळी डायट हा शब्द अस्तित्वात नव्हता. त्यामुळेच वजनावर नियंत्रण ठेवणे किंवा मोजकेच खाणे तसेच कमी खाणे असे कोणी लक्ष देत नसे. पण काहीही भरपूर खाल्ले ना तरी सर्व अन्नाचे पचन होत असे. आताच्या काळात सर्व परिस्थिती उलट झाली. पण अलीकडच्या काळात खुप बदल झालेला दिसतोय. अलीकडे वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप गोडधोड पदार्थ खाल्ले जात नाही. खाण्याचे प्रमाण पण कमी असते पण डायटच्या नावाखाली काही लोक जेवण कमी करतात आणि फास्टफूड जास्त खातात. एवढं सांगायच तात्पर्य असे की आपण खरवस कसे बनवतात ते पाहणार आहोत.

साहित्य:

१ लिटर चिक

१ लिटर  दुध

४ वाटी साखर कमी जास्त करू शकता

२ चमचे वेलचीपूड

१/२ वाटी खोबरे किस

५ ते ६ केशराच्या काड्या

 

टीप:

१ )  ताजा जर चिक असेल तर जेवढ चिक तेवढेच दुध घ्या.

२ ) ४ ते ५ दिवसाचा चिक असेल तर दुधाचे प्रमाण कमी करा.

 

कृती:

१. प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात १ लिटर चिक ओतून घ्यावे. त्यात १ लिटर दूध घालावे.

२. वरती दिलेले प्रमाणे साखर घालावे, वेलचीपूड घालावे.

३. खोबऱ्याचे किस घालावे.

४. सर्व मिश्रण ढवळून घ्यावे, साखर विरघळून घ्यावे.

५. नंतर चिकासाठी पातेल घेतले त्याहीपेक्षा मोठ पातेल घ्यावे. आणि गॅसवर ठेवावे.

६. ५ ते ६ ग्लास पाणी पातेल्यात घालावे.

७. त्यात एक पातेल उपड घालावेत. पाण्याला उकळी आली की चिकाचे मिश्रण पातेल्यावर ठेवावेत. आणि झाकण ठेवावे.

८.आतील वाफ मिश्रणात जाऊ नये म्हणून. परत आणखीन एक झाकण ठेवा.

९. १/२ तासाने झाकण काढा. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

१०. तयार आहेत खरवसाच्या वड्या

 

खरवस प्रकार २

 

साहित्य:

१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक (खाली महत्त्वाची टिप नक्की वाचा)

१ लिटर दुध

दोनशे ते अडीचशे ग्राम साखर (साधारण १ पाणी प्यायचे फुलपात्र)

२-३ चिमटी केशर

१/२ टीस्पून वेलचीपूड

मोठा कुकर

कुकरच्या आतील दोन्ही डबे (टीप २ पहा)

 

कृती:

१) केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.

२) चिक आणि दुध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी.

३) केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.

४) तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे. कुकरचे २ मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक डबा ठेवावा. वर अजून एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी. ५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. गार होईस्तोवर हवेवर उघडेच ठेवावे. कोमटसर झाले की खाल्ले तरी चालते. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतात. खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.

 

टीप:

१) चिक पहिल्या दिवसाचा असल्यास दाट असतो त्यामुळे त्यात तेवढेच दुध घालावे लागते (१ लिटर चिकास १ लिटर दुध) पण जर दुसऱ्या दिवसाचा चिक असल्यास निम्मे दुध लागते. आणि तिसऱ्या दिवसाला निम्म्याहून थोडे कमी लागते. चिक विकत घेताना तसे विचारून घ्यावे.

२) कुकरच्या आतील डब्ब्यांपेक्षा पोळी ठेवायला जे स्टीलचे डबे वापरतो तेही वापरू शकतो. खरवस उकडताना वर डब्ब्याचे झाकण न लावता ताटली ठेवावी म्हणजे कुकरमधून बाहेर काढताना त्रास होत नाही. खरवस हवेवर निवळला की डब्ब्याचे झाकण लावून तसाच फ्रीजमध्ये ठेवू शकतो.

३) साखरेपेक्षा गुळाचा खरवस जास्त खमंग लागतो. यात आवडीनुसार साखर किंवा गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.

४) वेलचीपूड ऐवजी जायफळ घातले तरी छान लागते.

५) खरवस उष्ण असतो त्यामुळे गरोदर स्त्रियांनी हे खाणे टाळावे.

 

 

 

– अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.