दोषी सुटू नये मात्र, निरपराधांवर कारवाई नको – किशोरआप्पा भोसले

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पोळ्याच्या मिरवणुकीतील दगडफेकीवरून प्रशासन आणि शासनामध्ये अंतर्गत द्वंद उफाळले आहे. शासन आणि प्रशासनाच्या कुरघोडीत सामान्य जनता भरडली जात आहे. सणासुदीच्या दिवसांत सत्तेचा माज आलेल्यांनी मुठभर अवैध व्यावसायिकांच्या मदतीने बंद पुकारुन खामगांव शहरातील  शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा परिस्थितीत दोषी सुटू नये, मात्र निरपराधांवर कारवाई न करता पोलिसांनी निर्भिडपणे आपले कर्तव्य बजावावे, असे निःसंदिग्ध आवाहन माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे.

खामगाव शहरात सर्व समाजबांधव गुण्या गोविंदाने एकत्र नांदत असतांना दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी पोळ्याच्या दिवशी  बैलांच्या मिरवणुकीत झालेल्या घटनेवरुन येणाया काळातील श्री गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव, दसरा उत्सव,जगदंबा उत्सव तसेच इतरही धार्मिक, सामाजिक उत्सव शांततेत व सामाजिक ऐक्य कायम ठेवत पार पाडावे म्हणून  या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली. दरम्यान, पोलीसांच्या कारवाईमुळे पोटशूळ उठलेल्या लोकप्रतिनिधीने आणि त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या काही  चेले चपाट्याांनी  खामगावातील शांतता भंग करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिस प्रशासनालाही आव्हान दिलं जात आहे. बंद पुकारुन, बंदच्या दिवषी दडपशाही करण्याकरीता कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढून शिवाजी नगर आणि शहर पोलीस स्टेशन समोर पोलीसांसमोरच पोलीस प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी करण्यात आली.

बाईक रॅली गांधी चौकात आली असता आमदार फुंडकरांनी वंदेमातरम् गणेश मंडळासाठी तयार करण्यात आलेल्या डायसवरुन कार्यकर्त्यांना भाषण देतांना सांगितले की, पोळयाच्या सणात ज्या युवकांवर पोलीसांनी कारवाई केलेली आहे ती कारवाई आज संध्याकाळपर्यंत मागे घेतली नाही तर आज संध्याकाळी होणा-या शांतता समितीच्या मिटींगमध्ये आम्ही बहिष्कार टाकु, एकही गणेश मंडळाचा पदाधिकारी, कार्यकर्ता तेथे मिटींगमध्ये जाणार नाही असे सांगितले. तसेच जो पर्यंत या तीनही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तो पर्यंत एकही मंडळाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचे नाही असे सांगितले. सोबतच पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला इशारा देतांना फुंडकरांनी सांगितले की, जर कोणाला हात लावला तर याद राखा तुमच्या समोर आकाश फुंडकर उभा आहे असे चिथावणीखोर वक्तव्य करुन पोलीस प्रशांसनाच्या कारवाईला अडथळा निर्माण केला आहे. त्याच्या पुराव्याचा व्हिडीओ फुंडकर यांच्या फेसबुक पेजवर तसेच काही व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये काही पत्रकार माध्यमांकडे सुध्दा उपलब्ध आहे.

एखाद्या वेळी पोलिसांनी चुकून कारवाई केल्यास न्याय मिळविण्यासाठी त्यांचे वरिष्ठ तसेच न्यायपालिका अस्तित्वात आहेत.  मात्र, स्वतः लोकप्रतिनिधी असतांनाही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता, आमदाराने ‘दादा’गिरी चालविली आहे. शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे हा गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण करण्याचा कळस असून पोलिसांनी आपल्या पध्दतीने कोणत्याही दबावाला न जुमानता पादर्षक कारवाई करावी. कारवाई करताना दोषी सुटता कामा नये मात्र, कोणत्याही निरपराधावर कारवाई करू नये याची  दक्षता पोलिसांनी घ्यावी.

सत्ता ही उन सावली सारखी असते. ती कधी येते कधी जाते. म्हणून आमदार फुंडकरांनी खामगाव शहरातील शांतता भंग करण्यासाठी पुढाकार घेण्यापेक्षा अवैध धंदे वाल्यांना पाठबळ देण्यापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास भरविण्यासाठी जमिनीवर येऊन काम करावे अशी अपेक्षा माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी व्यक्त केली आहे.

शांतता समितीवर बहिष्कार निषेधाहार्य 

सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि तत्कालीन कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आणि विद्यमान उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी घरोब्याचे संबंध असतांना पोळयाच्या दिवशी झालेल्या घटनेत जर पोलीसांनी चुक केलेली असेल त्याबाबत आपण वरिष्ठांनी भेटून  पोलीसांची चूक दुरूस्त करता आली असती. मात्र ज्या रात्री  भारत- पाकिस्तानचा संवेदनशील क्रिकेट सामना होणार असल्याच्या काही तास अगोदर  बंदची बेकायदेशीरित्या हाक देणे, स्वःतच्या फेसबुक पेजवरून चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि पोलीसांच्या शांतता समितीच्या सभेवर बहिष्कार टाकणे म्हणजे शहरातील शांतता भंग करण्याच्या दृष्टीनेच आपले प्रयत्न असल्याचे दिसून येते. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने बंदला परवानगी देवु नये असा निर्णय दिलेला आहे. म्हणजेच बंदची परवानगी नसतांना बंद पुकारुन पोलीसांना व जनतेला गणेशोत्सवा दरम्यान  वेठीस धरण्यामागे आपले मनसुबे योग्य नसल्याचे दिसते. त्याचवेळी रॅलीत काही तडीपार, अवैध व्यावसायिक आणि रेती माफीयांचा सहभाग म्हणजे आपला हेतू  वेगळाच असल्याचे अधोरेखीत होते. गुन्हेगारीच्या उद्दात्तीकरणासाठीच आपण शक्तीप्रदर्शन करीत असल्याचे दिसून येते असा टोलाही माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी लगावला आहे.

खामगांव शहराला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणुन एस. श्रवण दत्त हे कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले आहे. श्रवण दत्त यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खामगांव शहर व परिसरातील  अवैध धंदे बंद होवुन  गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठया प्रमाणात आळा बसला आहे. पोळयाच्या दिवशी झालेल्या घटनेत जे            निरअपराध युवक असतील, ज्यांची नावे पोलीसांनी चुकीने टाकली असतील तर त्या दिवशीच्या घटनेचे व्हीडीओ फुटेजेस तपासुन निरअपराध युवकांची नावे त्यामधुन काढून टाकण्यात यावी अशी विनंती देखील माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

तसेच पत्रकार परिषद घेऊन बंदची हाक देणे, गैरकायदेशीर मंडळी जमा करुन, बाईक रॅली काढुन पोलीस स्टेशनसमोरच तसेच ठिक-ठिकाणी पोलीस प्रशासनाविरुध्द निषेध व मुर्दाबादच्या घोषणा देणे आणि पोलीसांनी कारवाई केली तर याद राखा अश्या प्रकारचा इशारा देवुन पोलीसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करणे हया सर्व बाबी निषेधाहार्य असुन या प्रकरणी झालेली पत्रकार परिषद, बंदच्या दिवशी काढण्यात आलेली बाईक रॅली, सभेतुन पोलीस प्रशासनाला दिलेली चिथावणी या सर्व घटनेचे व्हीडीओ फुटेजेस तपासुन पोलीसांनी या प्रकरणात सर्व संबंधीतांवर कारवाई करुन पोलीस प्रशासनासमोर कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही याचा प्रत्यय कारवाईच्या माध्यमातून समोर आणावा व पोलीस प्रशासनाची प्रतिष्ठा जपावी अशी  मागणी देखील पोलीस प्रशासनासह वरिष्ठांकडे माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.