उद्या जळगाव विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३१ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यंदा १०७ सुवर्णपदक तर १६४ पीएच.डी धारकांना पदवी देण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांचे दीक्षांत भाषण होणार आहे. एकूण ३७ हजार १६९ विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून या दीक्षांत समारंभात नोंदणी केलेल्या २०८५९ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ११५०२ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४०४३ स्नातक, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे ४३२७ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे ९८७ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३८४, मु.जे महाविद्यालयाचे १६०७, प्रताप महाविद्यालयाचे १ हजार, जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ४०९ अशा एकूण ३४०० विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील १०७ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. यामध्ये ६९ विद्यार्थिनी व ३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच २ सुवर्णपदके समान गुणांमुळे विभागून देण्यात आलेली आहेत. या समारंभात १६४ पीएच.डी. धारक विद्यार्थी देखील पदवी घेणार आहेत.

सर्टीफिकेट सोबत ‘माझं विद्यापीठ’चे स्टिकर विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ विषयी असलेली आत्मियता लक्षात घेवून व विद्यापीठाचे ब्रँडीग व्हावे या हेतूने या वर्षी प्रथमच डिग्री सर्टिफिकेट सोबत ‘माझं विद्यापीठ, माझं ज्ञानवैभव’ असा मजकूर असलेले स्टिकर स्नातकांना दिले जाणार आहे. ते स्टिकर विद्यार्थ्यांनी आपल्या घरात प्रथमदर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे. पत्रकार परिषदेला प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, दीपक दलाल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.