बहूदास ते तापसी तीर्थवासी I गिरीकंदरी भेटी नाही जनासी II

0

करुणाष्टक-17

बहू दास ते तापसी तीर्थवासी I गिरीकंदरी भेटी नाहीं जनासी II
स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों I
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II

कावीळ झालेल्या माणसाला सारे जग पिवळ दिसत असे म्हणतात. जशी दृष्टी तशी सृष्टी हा नियमच आहे. समर्थांना सगळीकडे दास, भक्त दिसतात. समर्थांकडे अल्प, स्वल्प, छोटसं ही भाषाच नाही. याला कारण त्यांचा पिंड भक्तांकडे, दिव्यतेकडे, उत्कृष्टतेकडे झेपावणारा आहे. ते प्रतिपादन करतात की मी कितीतरी तापसी पाहिले. अरे त्यागाशिवाय खरं सुख थोडंच मिळतं. तीन दिवसात साक्षात्कार झाला असता तर ऋषी-मुनी संत साधक वर्षानुवर्षे जनसंपर्क पासून दूर राहून नाम, ध्यान, साधना एकांतात हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन का करत होते ? त्यांनी बारा बारा वर्षे तप केले, शारीरिक तप होते त्याच बरोबर मानसिक तप केले. म्हणजे मनाला पवित्र शुद्ध होऊन त्यांनी स्वाध्याय अभ्यास केला. वाचिक तप सुद्धा केले.

देवाचेच नाम, ध्यान, स्तोत्र, प्रार्थना, आरती, प्रवचन, सत्संग, चिंतन ‘अखंड खंडेना जीवन I रामकृष्ण नारायण II’ असं त्यांचं होऊन गेलं. अरे मी संतचरित्रे पाहिले, ऐकले, तर बहुतेक मंडळी तरुणपणीच घरादाराचा त्याग करून तीर्थयात्रेस निघाले. श्रीमद आद्य शंकराचार्य असामान्य बुद्धिमत्ता असलेले वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचा अध्यापन संपून गृहत्याग करून पायी प्रवास करीत नर्मदा तटी माधांता येथे आले. गुरूच्या आज्ञेनुसार धर्मसंस्थापना करण्यासाठी आचार्यांनी केरळ ते काश्मीर अशी भारत यात्रा किमान तीन वेळा केली. चार दिशांना चार मठ स्थापन केले. लिंगायत धर्माचे संस्थापक श्री बसवेश्वर गृहत्याग करून कृष्णा काठावरील कूडल संगम येथे आले.

संत नामदेवांनी ज्ञानदेवांसह उत्तर भारत यात्रा केली. पंजाबमध्ये जाऊन भागवत धर्माचा प्रसार केला. सर्वसंग परित्याग करून त्यांनी मध्य भारतातील अनेक तीर्थ स्थळांचे दर्शन घेतले. संत मीराबाई कृष्णभक्ती साठी वृंदावनात गेल्या. पुरंदरदासही घरादारावर तुळशीपत्र ठेवून हंपी क्षेत्री गेले. श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी एकनाथ अंजन पर्वतावर गेले. अनेक तीर्थयात्रा केल्या तर संतश्रेष्ठ तुकाराम म्हणे भंडारा डोंगरावर सदा चिंतनात गढलेले असत.

असे अनेक थोर महात्मे होऊन गेले. ते तापसी होते. त्यांनी तीर्थयात्रा केल्या होत्या. या संतांचा प्रवास म्हणजे तीर्थयात्रा, विद्यापीठांना भेटी देणे. काशी , हरिद्वार, पैठण, नाशिक ही त्यांची मुक्तविद्यापीठ होती.

वयाची अट न घालता सगळे एकत्र येतात. ज्ञानाची देवाणघेवाण करीत समाज चिंतनात वेळ घालवीत. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी व्हावा या हेतूने संतांनी भारतभ्रमण केले.

आधी गिरीकंदरात जाऊन एकांतात साधना केली. फळ, कंदमुळे खाऊन जीवन व्यतीत केले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ अशा सृष्टीच्या सहवासात ते वर्षानुवर्षे परमेश्वर भेटीसाठी ध्यानमग्न राहिले. आपल्या दैवताचे सगुण दर्शन घेतले. अनुग्रह प्राप्त करून घेतला. श्री मोरया गोस्वामी थेऊरला चिंतामणीचे स्मरण करीत समाधी अवस्थेत 42 दिवस होते. त्यांनी चर्म चक्षूने चिंतामणी पाहिला. भगवंत भेटीचा अखंड ध्यास एकांतात जाऊन केलेली साधना याने त्यांचे जीवन कृतार्थ झाले. आधी घरादाराचा, कुटुंबियांचा, सुखवस्तु जीवनाचा त्याग करून या महात्म्याने आपली उपासना आपले ब्रह्मचर्य व ईश्वर साक्षात्कार करून घेतला व नंतर हे समाज माणसात, लोकमानसात येऊन सेवा कार्य चालू ठेवले.

समर्थ पुढे म्हणतात, “स्थिती ऐकतात थोर विस्मित झालो” या भक्तांची, योग्यांची स्थिती पाहून मी आश्चर्यचकित झालो. नामदेवांचे ते कीर्तनात नाचणे, मीराबाईचे भजनात तल्लीन होणे, तुकारामांचे विठ्ठलमय स्वरूप सारच अवर्णनीय. खरतर परमार्थात प्रगती ही नाही व अधोगतीही नाही. आहे ती स्थिती स्वरुप स्थिती स्वरूपात निश्चळ राहायचं. खूप खटाटोप, नाही मांडामांड नाही. साधनेची साधना करायची पण त्यातही गुंतून नाही जायचं. नाहीतर बारा वर्ष नामस्मरण करतो, आला अहंकार.सर्व साधने वर पाणी पडते. राम करतो या भावाने साधना व्हावी.

समर्थांच्या जीवन चरित्रात आपल्यालाही विस्मय वाटावा अशी उपासना आढळते. वयाच्या बाराव्या वर्षी नाशिक येथील टाकळी क्षेत्री गायत्री पुरश्चरण व 13 कोटी रामनामाचा जप्त करून त्या पुरुषोत्तमाचा (मर्यादा) अनुग्रह त्यांनी प्राप्त करून घेतला. शिवतट जवळ शिवथर घळ, चंद्रगिरीची व हेळवालची घळ, अशा घळीत एकांतात त्यांनी साधना केली. त्यांचा पिंड हा किती अंतर्मुख, अध्यात्मिक होता याची कल्पना येते. पण समाजातील अज्ञान, दारिद्र्य, दैन्य दूर करण्यासाठी आसेतु हिमाचल त्यांनी तीर्थयात्राही केल्या. अध्यात्म निष्ठ अंतर्मुखतेचा उत्तर ध्रुव व समाजनिष्ठ बहिर्मुखतेचा दक्षिण ध्रुव यांचा सुमधुर समन्वय स्वतःच्या जीवनात साधुन मानवी जीवनाचे उन्नयन करण्याचा प्रयोग महाराष्ट्राच्या रंगमंचावर करून श्री समर्थ धन्य झाले.

II जय जय रघुवीर समर्थII

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.