ऐसा ठाव नाही कोठे । देव उराऊरी भेटे । ते क्षेत्र पंढरी ॥

0

पंढरपूर हे भू लोकिचे वैकुंठ आहे. दिंडीरवन, पांडूरंग नगरी, पंढरी अशी नामभिदाने या तीर्थक्षेत्राला लाभली. श्री विठ्ठलाच्या विश्वव्यापक अनुभूतीतून भाविक भक्तांना याचा प्रत्यय आला आहे. येथील देव साक्षात महाविष्णुचा अवतार असून क्षीरसागरात शेष नागाच्या फणावर पहुडलेले श्रीमहाविष्णु आणि लक्ष्मीमाता म्हणजे रुख्मणीदेवी वामांगी उभ्या आहेत.

कलियुगात अवतार घेऊन भगवंतानी पुंडलिकाची भक्ती पाहण्यासाठी या दिंडीर वनात यावं; आणि पुंडलिकानं फेकून दिलेल्या विटेवर उभं राहावं, असं हे विश्वनंदनीय परमचैतन्य, अनंतकोटी ब्रम्हांडनायकाचं लोभस सगुण रूपातलं तेजोमय रूप.. !

पंढरपूरच्या पांडूरंगाचं भक्तांवर मोठं प्रेम राहिलं आहे. म्हणून वारकरी लाखोंच्या संख्याने वर्षातून ४ वेळा आषाढी- कार्तिकी चैत्री व माघी बस एकादशीला वारकरी ज्ञानोबा तुकारामांचा गजर करीत येतात. विठुरायाचे दर्शन पूर्वी साधारणतः ७० ते ८० वर्षाआधी उराऊरी भेट (गळाभेट) व्हायची. कालानुरूप त्यात बदल झाला. वैष्णवांची मांदियाळी लाखोंच्या संख्येनं वाढली आणि मग या देवाचे चरणस्पर्श पायावर माथा टेकून होऊ लागले. पंढरपूर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. महाभारताच्याही आधी श्रीमद्भागवत (स्कंद ५ वा) भीमा- चंद्रभागा या नदीचे उल्लेख आढळतात. इ. स. ८३ मध्ये पंढरपूर हे नाव तीर्थक्षेत्राला पडले.

सातव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी भगवंताच्या पंढरपूर वास्तववर ‘पांडुरंगाष्टक’ लिहले. त्यातही पंढरपूरला महायोग पीठ म्हटले आहे. ‘महायोग पीठे तटे भीमरय्या’ असे भक्ति, ज्ञान, वैराग्य युक्त भागवत धर्माचे आद्यपीठ म्हणून पंढरीनगरी अनादि अनंत काळापासून साक्षात भगवंताने निर्माण केली आहे.

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी |
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥

भगवंताच्या सुदर्शनावर पंढरी नगरी वसली आहे. चार युगे कृत, त्रेता द्वापार, कली यांचा मेळ घातल्यानंतर भगवंताचे महायुग सुरु होते.

वेद शास्त्रात भगवंताच्या आयुष्याचा एक दिवस किती मोठा आहे, याचे विस्तृत वर्णन आहे. म्हणून भाष्यकारांनी- युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । नामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा ॥ असं साधंत वर्णन विठुरायाचं केलं आहे. पंढरीची वारी म्हणजे सुख समाधान न दर्शनी आनंद देणारा सोहळा आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन लाखो वारकरी उन्हा तान्हाची पाऊस वाऱ्याची, उष्मा थंडीची पर्वा न करता पायी टाळ मृदुंग वीणेच्या गजरात पंढरपुरात येतात व ओळीने या आपल्या इष्टदेवांचं दर्शन घेतात. जगाच्या पाठीवर कोठेही देवाच्या चरणस्पर्श पायावर माथा टेकून दर्शन होत नाही ते फक्त पंढरपुरात होतं, ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे.

चंद्रमासामध्ये येणारी एकादशी मोठी आषाढी म्हणून भक्तिभावाने केली जाते. एकादशीचं महात्म्य फार मोठे आहे. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. हिला देवशयनी एकादशीही म्हणतात. आषाढी एकादशीला श्री महाविष्णु अवतारातील विठोबांचे दर्शन होणे म्हणने पूर्वजन्माचे सुकृतच..! दक्षिणायन म्हणजे देवाचा दिवस आणि उत्तरायण म्हणजे रात्र झोपी जाण्याचा काळ. आषाढी एकादशीपासून उत्तरायण सुरु होते.

कोरोना संक्रमण काळापासून आजतागायत २ वर्षे सरली. वारीत खंड पडला. हजारो भाविक भक्तांच्या जिवीचा जिव्हाळा पांडुरंग भक्तिचा उमाका प्रत्येकाच्या हृदयात दाटून येतो. प्रातिनिधीक स्वरूपात दिंड्या मानाच्या निघाल्या आहेत. परंतु सामान्य दीन दुबळ्या वारकऱ्यांच्या हृदयात राहणाऱ्या या अनंतकोटी ब्रम्हांडनायकाच्या इच्छेपुढे मानव हतबल आहे. पंढरीची वारी पुन्हा नवचैतन्य घेऊन येईल स्थिती पूर्व पदावर आली की; वारीचे ते वैभव पुन्हा नव्याने प्राप्त होईल, तोपर्यंत हृदयी साठविलेला श्रीहरी आठवा म्हणजे अंत: चक्षुने आपणांस पांडुरंग मनाच्या गाभाऱ्यात दिसून येईल. शेवटी तो एक चराचर सृष्टीत साठवून उरला आहे.

॥ राम कृष्ण हरि॥

रमेश जे. पाटील
आडगांव ता. चोपडा,
जि. जळगांव.
९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.