आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।

0

भगवान दत्तात्रयांचा अवतार हा त्रिगुणी अवतार मानला जातो ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार. आदी अनादी काळापासून जे गुरु तत्व त्यातून प्रकटले आहे. ते सर्वव्यापी असल्याने दत्तात्रेय हे गुरुदेव दत्त म्हणूनही मानले गेले. नवनाथांना सनाथ करण्यासाठी त्यांना गुरु म्हणून बोध हा गुरुदेव दत्त यांनीच केला विषय वासनेपासून विरक्ती व देहबुद्धी पासून मुक्ती यासाठी उपास्य दैवत म्हणून सर्वच संत, महापुरुष, योगी, तपस्वी यांनी गुरुदेव दत्त यांनाच गुरु मानले. गुरुदेव दत्तात्रयांनी केले २४ गुरु हा त्यांच्या चरित्रातील भाग त्यांचे वेगळे पण मांडणारा आहे. या वेगळेपणात त्यांनी या २४ गुरूंकडून घेतलेले गुण हे विश्व् कल्याणासाठीच आहेत. भ्रमण व उपदेश आजही मार्गदर्शकच आहे. गुरुदेव दत्ताचा उपदेश नवनाथांना बोधप्रद ठरला. दत्त अवतारात शिव तत्व सामावलेले असल्याने त्याच बॊधाची परंपरा नाथसंप्रदायामध्ये कायम राहिली आणि पुढे ती वारकरी संप्रदायापर्यंत पोहचली गुरु पदाच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिन्द्र तयाचा मुख्य शिष्य ॥
मच्छिन्द्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वळाला गहनी प्रति ॥
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार सोपविले ॥

ज्ञानॆश्वर माऊलींचे गुरु त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे नाथसंप्रदायातीलच होते. त्यांना गुरुदीक्षा गहिनीनाथांनी दिली आणि निवृत्तीनाथांनी उपदेश केल्या नंतर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची रचना केली म्हणून संतवचनात म्हटले आहे त्या प्रमाणे..

ज्ञानदेवे रचिला पाया।
तुका झालासी कळस॥

याप्रमाणे भागवत धर्माची पताका महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आणि मग संपूर्ण देशात फडकली सर्वानी विठ्ठल भक्ती, महिमा यांचे मार्गक्रमण करताना गुरु परंपरेला व गुरु दत्तात्रेयांना अग्रस्थान दिले आहे संत एकनाथ महाराज म्हणतात .

आमुचे कुळीचे दैवत । श्री गुरु दत्तमहाराज समर्थ ।
तोचि आमुचा मायबाप ।नाशी सकाळ संताप॥

सर्वच संप्रदायातून गुरु परंपरा सक्रिय आहे. प्रत्येक संप्रदायात गुरु दत्तात्रेयांना सद्गुरुंचे स्थान आहे. या बाबतीत कुठलाही भेद नाही संत वाचनाने याची सिद्धता दिली आहे ते वचन म्हणजे

हरिहरा भेद। नका करू अनुवाद।
धरिता रे भेद । अधम तो जाणिजे ॥

त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता अनन्य भावाने श्री गुरुंना शरण जाणे. हाच बोध भक्तांनी घ्यावा जेणेकरून सर्वच पारिवारिक आडचणींमधून सोडविल्याचे कार्य गुरुदत्त करतील यासाठी दत्तनाम मुखी सदैव राहो संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे

हेचि आमुचे व्रत तप । मुखी दत्तनाम जप।
त्याविण सुटीका । नाही नाही आम्हा देखा ॥

म्हणून अन्यन्य भावाने दत्तनाम मुखी घ्यावे हाच बोध घ्यावा कुठल्याही भेदात, वादात न पडता भक्तीने मुक्ती कडे वाटचाल करूया एवढेच..

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.