जळगावसाठी ठाकरेंचा तर रावेरसाठी पवारांचा वेट अँड वॉच !

इच्छुकांचाही जीव टांगणीला : दरदिवशी नव्या नावांची चर्चा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले आहे. भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीत जळगाव आणि रावेरसाठी उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अद्याप जळगाव लोकसभेसाठी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे  या जागांसाठी सस्पेन्स वाढला असून उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी वेट ॲड वॉचची भूमिका घेतली आहे.

जळगाव लोकसभेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोणालाही अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. एकीकडे भाजपाने जळगाव आणि रावेर दोन्ही लोकसभा जागांवर उमेदवार घोषीत केले आहेत. मात्र या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या जागांवर कोणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स कायम राहीला आहे. दोन्ही जागांवारील इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला असून वेट अँड वॉच कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपाने स्मिता वाघ यांना तर रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अद्यापही आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. या ठिकाणी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेरच्या ॲड.ललिता पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची नावे चर्चेत असली तरी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील तसेच माजी खासदार ए.टी नाना पाटील हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेतून नेमके कोणाला संधी मिळणार या विषयी उत्सुकता वाढली असून राजकीय भुकंप होण्याची शक्यताच वाढली आहे.

सावध पाऊले उचलण्यावर सेनेचा भर

भाजपमध्ये नाराज असलेली मंडळी त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाशी संपर्क करत आहेत. भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले खासदार उन्मेष पाटील व माजी खासदार ए.टी. पाटील यांच्या महाविकास आघाडीत येण्याच्या शक्यतेमुळेच शिवसेना ठाकरे गट ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भाजपातील नाराज झालेली मंडळी पक्षातील नेत्यांशी संपर्क करीत आहेत. जळगाव लोकसभेसाठी उमेदवारीसाठी अनेक जण भेटी घेत असल्याचे शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीला बराच अवधी आहे. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील असे संजय सावंत यांनी म्हटले आहे.

रावेरसाठी सुरु झाली चढाओढ

रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटला असून ते या ठिकाणी तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नकार दिल्यानंतर बरेच इच्छुक पुढे आले असून उमेदवारीसाठी चढाओढ सुरु झाली आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी उमेदवारीचा शब्द मिळाला असल्याचे सांगितल्याने ही चढाओढ अधिक गतीने सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.