भाजपला जय महाराष्ट्र.. जळगावात चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहर मनपातील काही नगरसेवकांनी भाजपशी बंडखोरी करून शिवसेनेशी घरोबा केला होता. काही दिवसांपूर्वी पुन्हा काही नगरसेवकांनी घरवापसी करीत बांधली होती. दरम्यान, मनपातील शिवसेनेचे बहुमत कमी झाल्याने चिंता वाढली होती. सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून ४ नगरसेवकांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जळगाव मनपात काही महिन्यांपासून प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या पक्षातंर सुरु असल्याने नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपात गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.

तसेच पुन्हा भाजपात गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत.

आज शुक्रवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, ऍड.दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, कुंदन काळे, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.

शिवसेना भाजपला धक्का देण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरली असून भाजप आपल्या नगरसेवकांना आपल्याकडे रोखून ठेवण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. शिवसेनेचे बहुमत वाढल्याने आगामी महासभेत आणि इतर निर्णय घेतांना शिवसेनेला सहज शक्य होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.