प्रभू श्रीरामाबद्दल अनुद्गार नाहीच, हा भाजपचा कांगावा- उपमहापौरांचे स्पष्टीकरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा झाली. मात्र महासभेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर महापौरांनी महासभा अनिश्‍चीत काळासाठी सभा तहकुब केली. याचवेळी सभागृहात एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

“रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ व शक्तिशाली होता” असे बेताल वक्तव्य उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा महासभेत केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान हे वक्तव्य केल्यानंतर भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी उपमहापौर यांना व्यासपीठावर बसू न देण्याची मागणी केली. तसेच प्रभू श्रीरामाचा अपमान करणारे उद्धव ठाकरे सेनेचे महापौर व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपने यांचा जाहीर निषेध केला.

दरम्यान यावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आजच्या महासभेत जळगावच्या विकासाचे अनेक विषय प्रलंबित होते, त्याविषयांना आज मंजुरी मिळून सुरवात होणार होती. मात्र या विकासकामांचे श्रेय आम्हाला भेटू नये तसेच जळगाव शहरात विकास कामे होवू द्यायची नाही असा भाजपचा मानस असल्याने त्यांनी सभागृहात काहीही मुद्यांवरून गदारोळ घातला. सभागृहात विकासकामासंदर्भात मी रामायणाचे उदाहरण दिले. ‘रावण हा सर्वगुण संपन्न होता, परंतु तरीदेखील श्रीराम प्रभूंनी त्याचा वध केला कारण तो अवगुणी होता’ असे मी त्याठिकाणी बोललो. मी कोणतेही अनुद्गार काढले नाहीत. प्रभू श्रीरामांबद्दल मला आजही आदर असून प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दल कोणी काही बोलेल ते आम्ही खपवून घेणार नाही. परंतु भाजपने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. हा भाजपचा कांगावा आहे. अशी प्रतिक्रिया देत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.