९ नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करण्यात यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी ९ नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करावे. तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडाही ९ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरण या कामकाजाचा आढावा  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय वन अधिकारी गजेंद्र हिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार, समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) मनोहर चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी घटक कार्यक्रमातील सद्यस्थितीचा आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.‌

विशाखा समितीच्या कामांबाबत जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले की, कामांच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समित्या (विशाखा समिती) जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापन कराव्यात. याबाबतचा अहवाल गुगल लिंकद्वारे महिला व बालविकास विभागास देण्यात यावा. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये कॅन्टीन सुरू असतील त्या कँटीनचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रितसर परवाने घेण्यात यावेत. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री.प्रसाद म्हणाले की,  उपयोगिता प्रमाणपत्रे तात्काळ सादर करण्यात यावेत. विभागांनी  एक्सेल सीटमध्ये सादर करायची माहिती ८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सादर सादर करावी. जिल्हा नियोजन कामांचे त्रयस्थ पक्षाद्वारे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. लेखा परीक्षण करणाऱ्या संस्थेला वेळेवर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांनी सादर केलेल्या अहवालावर १५ दिवसांच्या आत तुमचे म्हणणे सादर करावे. कोणत्या कामांचे बिले काढण्यापूर्वी त्रयस्थ पक्षाकडून तपासणी करून घ्यावी. कामांचे भूमिपूजन संविधान दिन २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. भूमिपूजनासाठी पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची वेळ घेण्यात यावी. २६ जानेवारी २०२४ पर्यंत छोट्या स्वरुपातील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी. कामांच्या ठिकाणी कोनशीला लावतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाची परवानगी व मान्यता घेण्यात यावी. प्रत्येक कामांच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावे. असे ही त्यांनी सांगितले.

१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत‌‌ गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करणाऱ्या शाखा, उप व कनिष्ठ अभियंत्यांना बक्षिस देऊन‌ गौरव केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मानव विकास मिशन मधील कामांचा आढावा श्री.चौधरी यांनी‌ घेतला.‌

Leave A Reply

Your email address will not be published.