महापालिकेतर्फे दर महिन्याला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन

अधिकारी देणार विद्यार्थ्याना माहिती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. आज (ता.५) रोजी त्याचा शुभारंभ होणार आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली महापालिका असणार आहे.

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना कोणती पुस्तके वाचावित याचीही माहिती मिळत नाही, तसेच परिक्षेची तयारी कशापध्दतीने करावी याबाबत विद्यार्थी शासंक असतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता हे मार्गदर्शन  असणार आहे.

प्रत्येक महिन्याला कोणताही वार असला तरी 5 तारखेला हे मार्गदर्शन होणार आहे. यात राज्यातील आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी तसेच राज्या लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेले मार्गदर्शन करणार आहेत. दर वेळेस 2 अधिकारी मार्गदर्शन करतील. कोणती पुस्तके वाचावित, कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन करतील.

 विषयनिहाय मार्गदर्शन

5 ते 6 मार्गदर्शन सेमीनार झाल्यानंतर विद्यार्थ्याना विषय निहाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या-त्या विषयाचे तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

पहिला मार्गदर्शन वर्ग

आज (ता. ५) रोजी मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या  मजल्यावरील मनपा सभागृहात सायंकाळी 5 वाजता मार्गदर्शन वर्ग होणार आहे. यावेळी गौरी धायगुडे तहसीलदार  तालुका जिल्हा जळगाव व निरंजन कदम Assistant Commissioner GST उमरेड व डॉक्टर विद्या गायकवाड मनपा आयुक्त तथा प्रशासक हे मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीनी या वर्गाला उपस्थित रहावे असे अवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास यापुढे छत्रपती राजे संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे हे वर्ग घेण्यात येतील.

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग मोफत असणार आहे. आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक माहिती देणार आहेत. महिन्यातून एकदाच हे मार्गदर्शन वर्ग असणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त महापालिका डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.