पारोळ्यात अल्पवयीन चोरट्याने व्यवसायिकाचे एक लाख दहा हजार लांबविले…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा येथील दूध डेअरी मालकाने ग्राहकांना दुधाचे पेमेंट वाटण्यासाठी बँकेतून काढलेल्या १ लाख दहा हजार रुपये रस्त्यातच एका अज्ञात अल्पवयीन चोरट्याने लंपास करून नेल्याची घटना भर दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, टिटवी येथील सुनील हिम्मतराव पाटील हे गावातच दुधाचा व्यवसाय करतात. त्यांनी पारोळा येथील सेंट्रल बँकेतून दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास ग्राहकांना दुधाचे पेमेंट वाटप करण्यासाठी सुमारे १ लाख दहा हजार रुपये काढून पिशवीत ठेवले, व ती पिशवी मोटरसायकलच्या हँडलला टांगून ते कजगाव रस्त्यावर पोहोचले. तेथे आपल्या नातेवाईकाला बसमध्ये बसवण्यासाठी थांबले असता, या दरम्यान एका अज्ञात दहा ते बारा वर्षीय अल्पवयीनने मोटरसायकलला टांगलेल्या पिशवीसह एक लाख दहा हजार रुपये काढून पसार झाल्याची घटना घडली. घटनेच्या काही वेळाने त्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी लगेच आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. दरम्यान, या परिसरात नेहमी वर्दळ असल्याने भर दुपारी या चोरीच्या घटनेमुळे येथील व्यावसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी घटनास्थळी लगेच पोलिसांनी धाव घेऊन सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता, त्यात दहा ते बारा वर्षीय अल्पवयीन चोरटा पिशवी चोरून नेतांना चित्रीकरणात दिसत होता. याबाबत पारोळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.