उदंड जाहली इच्छुकांची संख्या; ‘महाविकास’ शोधतेय् योग्य घटीका !
रावेर, जळगाव मतदारसंघात रस्सीखेच : वरिष्ठांचे ‘वेट अँड वॉच’
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून दोन आठवडे उलटले असतांनाही महाविकास आघाडीकडून अद्यापही जळगाव व रावेर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात न आल्याने इच्छुकांची संख्या दर दिवसाला वाढत आहे. वाढत्या इच्छुक संख्येमुळे श्रेष्ठींसमोर यक्षप्रश्न उभा ठाकला असून प्रदेश पातळीवर योग्य घटीका शोधली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
महाविकास आघाडीच्या वाटाघाटीनुसार रावेर मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर जळगाव मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माघार घेतल्यानंतर इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर समोर आल्याने निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे. खडसे परिवार राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार नसल्याने भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी तडक शरद पवारांची भेट घेवून उमेदवारीची मागणी केली. पाठोपाठ जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनीही लढण्याची इच्छा व्यक्त करीत चौधरींच्या उमेदवारीला ब्रेक लावण्याचे काम केले. उद्योजक श्रीराम पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेवून लढण्याचा मानस व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या अचानक वाढल्याने पक्षश्रेष्ठींनाही काही प्रमाणात हायसे वाटल्याने ते आता यादी जाहीर करण्यास तारीख पे तारीखचा खेळ खेळत आहेत.
जळगाव लोकसभा मततदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना अद्यापही योग्य उमेदवाराचा शोध घेण्यावर भर देत आहे. जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व ॲड. ललिता पाटील यांची नावे सुरुवातीला चर्चेत आली. मात्र उद्धवसेना तगडा उमेदवार शोधण्यावर भर देत असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपाचे माजी खासदार ए.टी. पाटील व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना गळाला लावण्यासाठी ते प्रयत्नांची शिकस्त करीत असून ते अद्यापही मशाल हाती घेण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. महिला उमेदवार देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवरुन होत असून त्यासाठी उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा यांचेही नाव चर्चेत आले आहे. एकंदरीत उद्धवसेनेतही इच्छुकांची संख्या वाढल्याने त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीला बऱ्याच काळ हाती असल्याने उद्धवसेनाही योग्य घटीकेची वाट पाहत आहे.
घटीका जवळ येताच उडणार ‘बार’!
शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धवसेना उमेदवारी जाहीर करण्यासाठी योग्य घटीकेची वाट पाहत आहे. योग्य उमेदवार नजरेत भरला की लागलीच ‘बार’ उडविला जाणार आहे. एकंदरीत इच्छुकांची संख्या उदंड जाहल्याने ते योग्य घटीकेवरच लक्ष केंद्रीत करुन आहेत. भाजपाने दोघा मतदारसंघात महिला उमेदवार दिल्याने महाविकासही सक्षम महिला उमेदवाराचा शोध घेत आहे.