जळगाव लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. या दोन्ही जागांवर २०२४ साठी भाजपतर्फे उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तथापि महायुतीतील घटक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभेच्या जागांपैकी ‘जळगाव लोकसभा मतदार संघात शिंदे गटाच्या शिवसेनेची ताकद भाजप पेक्षा जास्त असल्याने जळगाव लोकसभेची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळावी’ असा दावा रविवारी झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समोर केला.

रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी जळगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी मार्गदर्शन करताना ‘जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी’ अशी मागणी केली. ही मागणी करताना गुलाबराव पाटील म्हणाले, जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव आणि पारोळा-एरंडोल या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. यातील मतदार संघात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे जळगाव लोकसभेच्या जागेवर शिंदे यांच्या शिवसेनेचा हक्क असल्याचे समर्थन गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे महायुतीतील भाजप शिंदे यांच्या शिवसेनेत सर्व काही अल्बेल नाही, हे स्पष्ट होते. भाजप शिवसेनेत कुरबुरी सुरू असल्याचे जाणवते. तरीसुद्धा आमच्यात काही मतभेद नाही अशी सारवासारव मंत्री गुलाबराव पाटलांनी केली.

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत रस्सीखेच सुरू असली, तरी ‘आमच्यात कसलेही मतभेद नाहीत’ असे या तिन्ही पक्षांतर्फे जाहीरपणे सांगितले जाते. परंतु शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काय लागतो, याकडे भाजप लक्ष ठेवून आहे. जर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र झाले तर भाजपकडे बी प्लॅन तयार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्व आमदारांना भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसल्याने सर्वांना भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे भाजप अधिक शिवसेना यांची ताकद वाढेल. त्यामुळे भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवावी लागण्यास एखादा जास्तीच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेची जागा दिली गेली, तरी भाजपला फरक पडणार नाही. त्यामुळे आतापासून जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली जात आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपात विलीन झाली तर महाराष्ट्रात भाजप तर्फे मिशन लोकसभा निवडणूक सोपी जाणार आहे. परंतु आमदार अपात्रतेचा निकाल काय लागतो? त्यानंतरच लोकसभा जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे. जळगाव लोकसभेच्या जागेसाठी हक्क सांगितला जात असला तरी संवादातून हा प्रश्न सुटेल, या शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसेनेचा आक्रमकपणा बोथट झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून भाजपबरोबर दोन हात करूच शकत नाही.

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, या म्हणण्याला फक्त तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, म्हणून ताकद जास्त आहे, अश्या म्हणण्याला अर्थ नाही. कारण गुलाबराव पाटील, किशोर आप्पा पाटील आणि चिमणराव पाटील हे तिघेही मूळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. या तिन्ही मतदार सर्वसामान्य तसेच मूळ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच असल्याने तेथे शिवसेना विभागली गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंची दगा फटका करून भाजपबरोबर सत्तेत सामील झाले आहेत. शिवसेना आमदारांनी खोके घेऊन गद्दारी केली असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये बळवली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील मूळ शिवसेनेच्या मतदान मतदानात घट होणार, हे निश्चित..

तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनातर्फे या तीनही मतदार संघात तोडीस तोड निर्णय करण्यात आला आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी युती झाली असून या तिघांविरोधात पर्यायी ‘निवडून येणारे उमेदवार’ देण्याबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे पाचोरा-भडगावमध्ये किशोर आप्पा पाटलांना टक्कर देण्यासाठी माजी आमदार कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. पारोळा एरंडोलमध्ये आमदार चिमणराव पाटलांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांची उमेदवारी पक्की आहे. पारोळा कृषी उत्पादन बाजार समितीत आमदार चिमणराव पाटील पिता पुत्रांचा सतीश पाटलांनी सुपडा साफ केला आहे. ही विधानसभेची रंगीत तालीमच म्हणता येईल. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना एकदा पराभूत करणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मतदार संघात झंजावात सुरू केला आहे. आजमितीला जळगाव ग्रामीण मतदार संघातील जनमत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचे बाजूला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेनेची स्थिती डळमळीत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.