दूध संघातील खडसेंचा फोटो हटवला, काय म्हणाले मंत्री महाजन..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब कऱण्यात आला. यांनतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आमदार मंगेश चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मात्र यावेळी अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो हटवण्यात आल्याने याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या सात वर्षांपासून जळगाव जिल्हा दूध संघावर एकनाथ खडसे यांची सत्ता होती. दरम्यान जिल्हा दूध संघात अनेक राजकीय घडामोडीनंतर नुकतीच निवडणूक पार पडली. यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट खडसेंच्या बालेकिल्यात निवडणूक लढवत खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव करत जिल्हा दुध संघ निवडणुकीत हिरो ठरले.

दरम्यान दूध संघाच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाची पहिलीच बैठक आज सकाळी पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष केबिनमध्ये असलेला एकनाथ खडसे यांचा फोटो तातडीने हटवण्यात आला.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन..

याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, मला कळत नाही अध्यक्षाच्या केबिनमध्ये खडसे यांचा फोटो कसा काय लागू शकतो. जिवंतपणी एखाद्या व्यक्तीचा फोटो कसा लावता येतो? प्रोटोकॉल असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचा लावू शकतो. पंतप्रधान, राष्ट्रपती तसंच मुख्यमंत्री यांचे फोटो लावता येतात. पण व्यक्तीचा फोटो लावता येत नाही. म्हणून निवडून आलेल्या सर्व संचालकांनी खडसेंचा फोटो खाली घेण्याची विनंती केली. त्यानुसार शिपायाच्या मार्फत आम्ही तो फोटो काढायला लावला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.