तिरंगा अजूनही छतावर ! प्रशासनाचे नियम बसवले धाब्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात आले होते. १५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी घरावरील झेंडे काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र अद्यापही तिरंगा ध्वज छतावर कायम असून, प्रशासनाच्या आवाहनाचा नागरिकांना विसर पडला आहे.

नागरिकांनी इमारती, घरांवर ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करून तिरंगा ध्वज उभारावा असे आवाहन करण्यात आले होते. काहींनी वाटपात आलेले झेंडे तर काही नागरिकांनी स्वतः खरेदी करून आपल्या घरावर झेंडे लावले. या अभियानासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली होती. १३ ऑगस्टला ध्वज उभारून १५ ऑगस्टला ध्वज उतरवावा अशी ध्वजसंहिता तयार करण्यात आली होती. ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा. प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये. तिरंगा ध्वज सन्मानाने जतन करून ठेवावा यासह इतर नियमावली तयार करण्यात आली.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट जवळील नवीपेठ येथील महेंद्र ट्रेनिंग कंपनी व आय एफ बी पॉईंट या दोन्ही दुकानांच्या छतावर अद्यापही झेंडे दिसून येत आहे.  तसेच अनेक नागरिकांनी देखील आपल्या छतावरील ध्वज काढलेले नाहीत. परिणामी जोरदार वाऱ्यामुळे व पावसामुळे हे ध्वज खराब होत असून आपल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.