शहरातील चौपदरी महामार्ग अद्याप अंधारातच

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर होणाऱ्या अपघाताची मालिका थांबावी म्हणून महाद्प्रयत्नाने खोटे नगर ते कालिंका माता अशा साडेसात किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले. आधी चौपदरीकरणाचे काम होण्यासाठी या महामार्गावर विजेचे खांब उभारून त्यावर दिवे लावले जायला हवे होते. तथापि महापालिकेच्या अकार्यक्षम प्रशासनामुळे ते होऊ शकले नाही. आधी चौपदरीकरण झाले त्याचे लोकार्पण झाले, परंतु हा महामार्ग संपूर्ण अंधारातच आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात पुन्हा सुरू झाले विजेचे खांब लावून त्यावर दिवे बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया काही अडचणीमुळे पूर्ण होऊ शकली नाही, असा खुलासा महापालिकेतर्फे करण्यात आला.

अपघाताची संख्या वाढत आहे. तक्रारी वाढण्याचे प्रमाण लक्षात घेऊन चौपदरी महामार्गाचे मधोमध उभारलेले डिव्हायडर फोडून चार महिन्यांपूर्वी विजेचे खांब उभारले गेले. दिवाळी सणात महामार्गाचा अंधार दूर होईल, असे महापालिकेतर्फे जाहीर केले गेले. परंतु अद्याप महामार्गावर अंधारच आहे. विजेच्या खांबावर विजेचे दिवेच लावले गेले नाहीत. कंत्राटदाराचे पेमेंट झाले नसल्यामुळे दिवे लावणे रोखले गेले असल्याचे कळते. याबाबत महापालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता, महामार्गावरील विजेच्या खांब उभारून दिवे लावण्यासाठी जो शासकीय निधी मंजूर झाला आहे, तो निधी विहित वेळेवर खर्च न झाल्याने परत गेला. त्यामुळे कंत्राटदाराने निविदाप्रमाणे केलेल्या कामाचा मोबदला देण्यास महापालिकेकडे पैसाच उपलब्ध नाही.

विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात जळगावचे खराब रस्ते आणि विकासाचा मुद्दा शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी उचलून धरला. प्रश्नोत्तराच्या सत्रात आमदार भोळे यांचेकडून प्रश्न विचारला गेला. नगरविकास मंत्र्यांच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. जळगाव शहराचे रस्ते खराब आहे, याची कबुली मंत्री महोदयांनी मान्य केली. त्यासाठी केंद्र शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत शंभर कोटीच्या रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तो मंजूर झाला तर शहराचे रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल, असे सांगून तोंडाला पाने पुसली गेली. गेल्या पाच वर्षापासून अमुक एवढा निधी मंजूर झाला आहे, असे सांगण्यात येते. परंतु ठोस निधी मिळत नाही. 43 कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निवेदला स्थगिती मिळाल्याने आतापर्यंत रस्त्याची कामे होऊ शकली नाहीत. मात्र ती स्थगिती उठली आहे. काही रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. परंतु शहरातील जे रस्ते केले जात आहेत, त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्याच्या बोजवारा उडणार आहे. पुन्हा या रस्त्यावरील खड्ड्यांचा जळगावकरांना सामना करावा लागणार. त्यासाठी शहरातील रस्ते पुन्हा पुन्हा खराब होणार नाहीत, याची दखल शासनाने घ्यावी. अन्यथा येरे माझ्या मागल्या असेच चालू राहील…!

Leave A Reply

Your email address will not be published.