आरोग्य विभागाचा अफलातून कारभार ! ANM प्रशिक्षणाची संधी, अर्जासाठी दोन दिवसाचा अवधी

0

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा यांच्या वतीने स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (ए.एन.एम.) या 2 वर्षाच्या प्रशिक्षणाकरीता 40 पदांसाठी जिल्ह्यातील एका दैनिकात 23 डिसेंबर 2022 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर जाहिरातीचे अवलोकन केले असता इच्छुक उमेदवारांना 20 ते 24 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामध्येही अर्ज बुलडाणा येथून घ्यावे व त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावे अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसात हे सर्व काही शक्य नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

सदर प्रकार हा कुठेतरी पाणी मुरत असल्यासारखा असुन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी इच्छुक उमेदवाराकडून होत आहे. सदर जाहिरातीमध्ये अर्ज मिळण्याची व स्वीकृतीची दिनांक 20 ते 24 डिसेंबर 2022 असतांना दि. 23 डिसेंबर 2022 रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. म्हणजेच इच्छुक उमेदवारांना केवळ दोनच दिवसाचा अवधी मिळणार आहे. ते ही ज्यांनी जाहिरात वाचली असेल त्यांनाच माहिती असणार. त्यातही अर्ज नमुना मिळण्यासाठी परिचर्या अधिकारी बुलडाणा यांच्याकडे अर्ज करुन तेथेच सादर करावा. अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रासह चारित्र्य प्रमाणपत्र, जिल्ह्यातील तहसीलदाराचे अलिकडचे रहिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदि कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. शाळा संबंधीत प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र उमेदवारांजवळ उपलब्ध असतात परंतु इतर कागदपत्रांची जुळवाजुळव दोन दिवसात करणे जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे सदर प्रशिक्षणाच्या भरतीमध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप होत असुन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करुन देण्याची मागणी इच्छुक उमेदवारांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.