जळगावातून मोठी बातमी : काँग्रेसचे 2 मोठे नेते निलंबित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलीय काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गांवडे यांनी याबाबतचे पत्र सोमवारी जारी केले आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत.  माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठं नाव आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते पक्षात सक्रीय आहेत. दरम्यान, डॉ. उल्हास पाटील यांनी आपली कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या निर्णयाने जळगाव काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

डॉ. उल्हास पाटील यांनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला लागोपाठ दोन धक्के बसले. पाटलांच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या वरिष्ठस्तरावर सोमवारी बैठक पार पडली. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. या बैठकीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. पक्षाने काढलेल्या पत्रात कोणतेही कारण न देता प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार कारवाई केल्याचे कळवण्यात आले आहे. पक्षाचे संघटन व प्रशासन विभागाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र उल्हास पाटील यांना दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.