५ लाखांची लाच : गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना ५ लाखांची लाच घेताना अटक केल्याची घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली. दिवाळी सणानिमित्त सर्व कार्यालयांना सुट्ट्या आहेत. पाडव्याच्या दिवशीच शासकीय कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोने लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.  जामनेर तालुक्यातील 38 वर्षीय तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा विस्तार अधिकारी तथा सध्या पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय 54) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (वय 53) हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत.

तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो. त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी 7 नोव्हेंबर रोजी दोघा लाचखोरांनी केली. लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुट्टीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला. सर्वत्र शासकीय सुटी असताना लाचखोर अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे दालन उघडले व तक्रारदाराकडून लाच स्वीकारली.

दरम्यान लाच घेताच तक्रारदाराने इशारा करताच एसीबीने लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाणे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.