जळगाव हादरले: रखवालदाराचा खून करून जबरी दरोडा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

निर्घृण खुनाच्या घटनेने जळगाव तालुका हादरलाय. जळगाव तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात अनोळखी चोरट्यांनी जबरी दरोडा टाकून शेत रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर लांबवल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

 

जबरी दरोडा

जळगाव तालुक्यातील जळगाव पाचोरा रस्त्यावरील वावडदा शिवारात चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकून शेत रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून केला. पांडुरंग पंडित पाटील (वय 52, बिलवाडी) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

 

रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय 52, बिलवाडी) हे बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणार्‍या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले असता मध्यरात्री दरोडेखोरांनी शेतात प्रवेश करीत रोटोव्हेटर व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रखवालदार पांडुरंग पाटील यांनी विरोध केला व दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्यांचा खून केला.

दरोडेखोरांनी ट्रॅक्टरसह रोटाव्हेटर घेवून पळ काढला तर नंतर बुधवारी पहाटे सहा वाजता शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.