भयंकर दुर्घटना : मशिनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू

मुंडके धडापासून वेगळे; जळगाव MIDC तील घटना

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव एमआयडीसीमध्ये भयंकर दुर्घटना घडली आहे. व्ही-सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मुंडके धडापासून वेगळे होऊन दुर्देवी मृत्यू झाल्याची मंगळवारी १२ मार्च दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती गोविंदा ठाकरे (वय ३५, रा.सुहागी ता.खालवा जि.खंडवा ह.मु. जळगाव) या विवाहिता आपले पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह एमआयडीसीतील मुकेश ऍग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत असून तेथेच राहत होत्या. नेहमीप्रमाणे आज मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता जेवण झाल्यानंतर महिला मजूर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या होत्या. यावेळी  मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्ट्यात अडकून त्यांच्या गळ्याला फास बसला. या घट्ट फासाने  महिलेचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पीएसआय रविंद्र गिरासे, बीट हवालदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयत महिलेच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.