लोकशाही न्यूज नेटवर्क
यंदा मॉन्सूनची हजेरी पाहिजे तशी नव्हते. सरासरी पूर्ण न करता मॉन्सूनने निरोप घेतला. मॉन्सून जाताच लगेच राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरु झाला. राज्यात सर्वच शहरांच्या तापमानात वाढ झाल्याचे जाणवत आहे.त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. पण आता राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातील नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार आहे. उन्हाचा तडाखा कमी होऊन आता वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे थंडी जास्त पडेल की नाही हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित राहिला आहे.
राज्यात सर्वात कमी तापमान जळगावात
ऑक्टोबर हिट आणि उन्हाचा चांगला चटका जाणवणाऱ्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरातील तापमानात बदल झाला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. जळगाव शहरात १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान जास्त होते. महाबळेश्वरमध्ये १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, असे एका दिवसासाठी म्हणावे लागेल.
पुणे शहराच्या तापमानात घट झाली असून, पुणे शहरात रात्रीप्रमाणे दिवसाही तापमान घाट पहायला मिळत आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तसेच मुंबईतील सांताक्रुझमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु आता राज्यातील सर्वच शहरांचे तापमान आता कमी होऊ लागल्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.