माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोंडगाव घटनेचा शोध अन बोध

अंगावर शहारे आणणारी खेडेगावातील पीडित बालिकेवरील अत्याचारानंतर खुनाची घटना:राज्यभर भरात सर्वच स्तरातून निषेध

0

लोकशाही विशेष लेख

जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील गोंडगाव (Gondgaon) या खेडेगावात दिनांक ३० जुलै २०२३ रोजी मानवी मनाला चटका लावणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. भर दुपारी गोंडगाव गावातील एका १९ वर्षाच्या नराधमाने ८ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिचा खून केला आणि खून लपवण्यासाठी तिचे प्रेत नराधमाने स्वतःच्या गोठ्यात चाऱ्याच्या ढिगार्‍याखाली लपवून ठेवले. पीडित बालिकेच्या वडिलांनी अपहरणाची फिर्याद भडगाव पोलिसात दाखल केल्यानंतर पोलिसांची चक्री फिरली, आणि तिसऱ्या दिवशी गोठ्यात सदर पीडितेचे प्रेत सापडले.

सिनेस्टाईल घटनेतील सूत्रधार संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) याला ताब्यात घेतले. त्यानंतर सदर घटनेचे वृत्त जिल्हाभरात आणि महाराष्ट्रभरात वाऱ्यासारखे पसरले. विधानसभेतही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित करून आवाज उठवला.

पीडित ८ वर्षाची बालिका आणि तिचा मोठा भाऊ घरून वडिलांकडे टपरी वजा दुकानात जेवणाचा डबा घेऊन गेले. काहींचे म्हणणे आहे छत्री आणायला गेले होते. तेथूनच घरी येत असताना नराधम स्वप्निल नावाच्या तरुणाने तिला उचलून नेले. गावात बैल जोडी स्पर्धा असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. नराधमाने पीडीतेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्या डोक्यात दगड मारून तिचा खून केला. हा खुनाचा प्रकार लपवण्यासाठी त्याने तिचे प्रेत स्वतःच्या गोठ्यातील चाऱ्याखाली लपवून ठेवले. रात्री त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे १ ऑगस्ट रोजी ढिगार्‍याखाली बालिकेचे प्रेत आढळून आले.

झटापटीत त्या पीडित बालिकेच्या तेथे पडलेल्या चपलेला पीडीतेच्या वडिलांनी ओळखले आणि त्यानंतर प्रेताचा छेडा लागला. संशयित आरोपी स्वप्नीलला अटक केल्यानंतर त्याने खुनाची कबुली सुद्धा दिली. त्याला अटक करून पोलीस व्हॅन मधून नेतांना गोंडगावच्या नागरिकांनी संतापाने दगडफेक केली. दगडफेकी प्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तथापि त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

या घटनेविरोधात दिनांक ४ ऑगस्ट रोजी भडगावात भव्य निषेध मोर्चा निघाला. मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे पीडित बालिकेच्या कुटुंबाचे सांत्वन केले. दुसरे दिवशी दिनांक ५ ऑगस्ट रोजी भडगावला कडकडीत बंद पाळून निषेध केला, तर सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी पाचोरा येथे सर्वपक्षीय भव्य मूक मोर्चा काढून पाचोरा बंद ठेवण्यात आला. जिल्हाभरात ठिकठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

गोंडगाव या खेडेगाव असलेल्या खेडेगावात अशा प्रकारची अमानवी घटना घडते, त्या मागचा शोध अन बोध घेण्याची गरज आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकरी उध्वस्त होत चाललाय. शेतकऱ्यांची शेती पिकत नाही. उत्पादित मालाला भाव मिळत नाही. शिकलेल्या तरुणाला रोजगार मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भाग अस्वस्थ झालाय. त्यातूनच रिकाम्या डोक्यातून गोंडगाव सारख्या अमानवी घटना होत आहेत. इतकेच नव्हे तर अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत.

तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत आहे. एकाच दिवसात पाचोरा तालुक्यातील तरुण-तरुणीच्या आत्महत्येचा घटना घडल्या. या मागच्या कारणाचाही शोध घेण्याची गरज आहे. अनेक तरुण तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. तसेच अशा घटना होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.

एकंदरीत गोंडगावच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. फास्टट्रॅक कोर्टद्वारे खटल्याचा निकाल लावला जाईल, निष्णात वकिलांची नियुक्ती करून आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल, पीडित कुटुंबांना शासनातर्फे मदत दिली जाईल, परंतु अशा प्रकारे होणाऱ्या घटना होऊ नये म्हणून शासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे. अन्यथा अशा अनेक बालिकांचा बळी जाईल…!

विधानसभा अधिवेशनात गोंडगाव घटनेचे पडसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दूरध्वनीवरून पीडित बालिकेच्या कुटुंबांचे केले सांत्वन

जलदगती न्यायालयाद्वारे व प्रतीत यश वकिलामार्फत खटला चालविण्याचे आश्वासन

भडगाव पाचोऱ्यात कडकडीत बंद व भव्य निषेध मूक मोर्चा

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची (Gulabrao Patil) गोंडगाव येथे पीडित बालिकेच्या कुटुंबाची भेट व सांत्वन

पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटलांनी (Kishore Patil) पत्रकाराबरोबर दूरध्वनीवरून केलेल्या अश्लील भाषेतील संवादाच्या क्लिपची महाराष्ट्रभर चर्चा

ग्रामीण भागात सुद्धा अशा प्रकारच्या अमाननीय घटना वाढण्याचे कारण काय?

ग्रामीण भागातील तरुण-तरुणींमध्ये नैराश्यातून वाढते अपहरण आणि आत्महत्येचे कारण काय?

पत्रकार आमदारांमधील अश्लील शिवराळ संवाद
सदर गोंडगाव घटनेच्या संदर्भात विश्लेषणात्मक वृत्त देणाऱ्या पाचोरातील ‘ध्येय वृत्त’चे संपादक संदीप महाजन यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जी अश्लील शिवराळ भाषा वापरून शिव्या दिल्या त्याची ऑडिओ क्लिप महाराष्ट्रभरात गाजली. आमदारांच्या तोंडी अशी भाषा ऐकून ऐकणारा प्रत्येक जण मात्र अवाक झाला, त्यात शंका नाही. वेगळ्या भाषेत सुद्धा आमदार बोलू शकले असते, पण या अश्लील भाषेचे आमदार समर्थन करतात. परंतु ऐकणारा कोणीही समर्थन करू शकणार नाही, एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.