मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारला भिक दो आंदोलन !

पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व सोबती संस्था पेण यांचा पुढाकार

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

पेण दि. ७ गेल्या १४ वर्षापासून सरकारी अनास्थेमुळे रखडलेला मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी सरकारने कोणती ठोस भूमिका घेतली नाही. गेली १४ वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा जगातील एकमेव असा महामार्ग आहे. एकीकडे समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) ७०१ किलोमीटर लांबीचा अवघ्या चार वर्षात बनवून होतो तर दुसरीकडे अवघ्या ५०० किलोमीटरचा लांबीचा असणारा मुंबई गोवा महामार्ग सरकारला पूर्ण करण्यासाठी १४ वर्षे लागतात. गेली १० वर्षे केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे. तरी कोकणी माणूस चांगल्या महामार्गापासून वंचित आहे.

झोपेच सोंग घेऊन झोपलेल्या सरकार आणि सरकारी यंत्रणांना जागे करण्यासाठी पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व सोबती संस्था पेण यांच्या पुढाकाराने मुंबई गोवा या महामार्गावर क्रांती दिन साप्ताहाचे औचित्य साधून १३ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारला भिक दो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आज पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मागील महिन्यात पळस्पे ते इंदापूर या ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी एक बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण केले जाईल. असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन वेळा दिले होते. मात्र त्यांचे हे आश्वासन म्हणजे भाजपने दिलेले गाजरच ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच पळस्पे पासून झालेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण म्हणजे जनतेची केलेली दिशाभूल आहे. या काँक्रिटीकरणाचा दर्जा अतिशय सुमार असल्याचे समीर म्हात्रे यांनी सांगितले.

या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भीक मागून येणारे पैसे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले जाणार आहेत. कारण सरकारकडे हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नसल्यानेच गेली अनेक वर्षे हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणारे प्रवासीच भीक घालून हे पैसे हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारला देणार असल्याचे समीर म्हात्रे म्हणाले. तसेच या आंदोलनासाठी तालुक्यातील विविध संघटना व संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसेच सेवाभावी संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन समीर म्हात्रे यांनी केले. या पत्रकार परिषदेत सोबती संस्थेचे अँड. मंगेश नेने हे ही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.