जळगाव जिल्हा बँकेतील सत्ता बदलाचा अन्वयार्थ..!

0

 लोकशाही संपादकीय लेख

 

वर्षभरापूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊन महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला होता. त्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. भाजपने निवडणुकीतून माघार घेतली होती. भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यांचा महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने विजय झाला. राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) चेअरमन आणि शिवसेनेचे सोनवणे व्हाईस चेअरमन पदी एक मताने निवडले गेले. चेअरमन गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात वर्षभर बँकेचे कामकाज समाधानकारकरित्या पार पडले. दरम्यान वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या सदस्याला संधी देण्यासाठी देवकरांचा राजीनामा घेतला गेला. वास्तविक गुलाबराव देवकरांची वर्षभराची कारकीर्द समाधानकारक असताना त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा घेऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी आवाज उठवला होता. परंतु ठरल्याप्रमाणे गुलाबराव देवकरांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना चेअरमन पदाच्या निवडी संदर्भात सर्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिले असल्याने खडसे म्हणतात तो चेअरमन होईल, असे वाटत होते. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू होती. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचे नाव चेरमन पदासाठी जाहीर करताच चक्रे फिरली आणि एकावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करून चेअरमन पदासाठी ऐनवेळी अर्ज भरला आणि एका मताने चेअरमन संजय पवार आणि व्हाईस चेअरमन अमोल पाटील (Amol Patil) हे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील हे एका मताने पराभूत झाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा बँकेची सत्ता आयती मिळाली. संजय पवारांच्या बंडखोरीला काँग्रेसच्या सदस्यांनी साथ दिली. म्हणून ऍड रवींद्र पाटील पराभूत झाले, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला असला तरी आतील गोटाची बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संजय पवारांना मदत केली, असे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते सदस्य फुटले? आणि ते का फुटले? या मागचे राजकारण काय? याचा अंतर्मुख होऊन खडसे यांनी विचार करण्याची गरज आहे. एकनाथ खडसेंचा गेम राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला, असे बोलले जात आहे. कारण रवींद्र पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध होता. हे जाहीरपणे बोलू शकले नाहीत पण गुप्त मतदानाने त्यांनी हे सिद्ध केले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांचा मनात काय चालले आहे, हे ओळखू शकले नाहीत. जिल्हा बँकेत ऍड रवींद्र पाटील यांचा पराभव म्हणजे आगामी काळात रवींद्र पाटलांच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत सुद्धा सदस्यांनी नाराजी असल्याचे यावरून स्पष्ट होते.

जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झालेली संजय पवार यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बंडखोरी केली, आणि विरोधकांच्या पॅनल मधून निवडून आले होते. सहकारात राजकारण नको, असे गोंडस वक्तव्य करून संजय पवार मी राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत शिंदे फडणवीस गटाच्या पॅनल मधून निवडणूक लढवत असताना विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन दूध संघाच्या निवडणुकी संदर्भातील भूमिका पटवून दिली. अजित पवारांनी हिरवा कंदील दिला, असल्याचे संजय पवारांनी स्पष्ट सांगितले होते. त्यावेळी संजय पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून काढून टाकू अशी वाचता केली गेली. परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी होऊ शकली नाही. त्यानंतर आता बंडखोरी करून विरोधकांच्या सहकार्याने जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्यावर ते पुन्हा अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. या सर्व घडामोडींचा अन्वयार्थ काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना निर्माण झाला आहे. एकंदरीत या घटनेच्या संदर्भात बोलायचे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा स्पोट होईल का? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जातोय. त्यामुळे एकनाथ खडसेंना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मधील एकजूट राखण्यासाठी परिश्रम करावे लागणार आहे, एवढे मात्र निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी नव्या अध्यक्षांची निवडणूक सुद्धा क्रमप्राप्त असल्याचे दिसून येते…!

Leave A Reply

Your email address will not be published.