जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील ढाके कॉलनी भागात राहणाऱ्या २८ वर्षी विवाहितेला एकाने अश्लिल मजकूर लिहून विवाहितेचे पती व नातेवाईकांना पोस्टाद्वारे पत्र पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ढाके कॉलनी भागात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहिता पती व सासरच्या मंडळींसोबत राहते. विवाहितेचे लग्न ठरल्याच्या काळात आणि विवाह झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने तिच्या पतीला व तिच्या नातेवाईकांना २०१८ पासून ते आजपर्यंत अश्लिल मजकूर लिहून तिची बदनामी व्हावी आणि तिचा सुखाचा संसार मोडावा या उद्देशाने पत्र पाठविले. तसेच पत्रात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे.
याप्रकरणी विवाहितेने बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस नाईक भारती देशमुख करीत आहे.