धर्मशाला ;- येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या निकालामुळे टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 92 वर्षांपासून सुरू असलेली तूट संपुष्टात आली आहे.
भारताने 1932 मध्ये कसोटी खेळायला सुरुवात केली आणि धर्मशाला येथील सामन्यापर्यंत भारताच्या पराभवांची संख्या त्यांच्या विजयापेक्षा जास्त होती. आता जय-पराजयाचा हिशेब समसमान झाला आहे. आता भारताच्या 579 कसोटी सामन्यांमध्ये 178 विजय आणि तेवढेच पराभव आहेत. 1 कसोटी बरोबरीत सुटली असून 222 अनिर्णित राहिल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये फक्त चार संघ असे आहेत ज्यांचे पराभवापेक्षा विजय जास्त आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया (413 विजय, 232 पराभव), इंग्लंड (392 विजय, 324 पराभव), दक्षिण आफ्रिका (178 विजय, 161 पराभव) आणि पाकिस्तान (148 विजय, 142 पराभव) यांचा समावेश आहे. भारताने आता विजय-पराजयाची संख्या बरोबरी केली आहे. सध्या भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यामुळे लवकरच आमचा संघ पराभवापेक्षाही अधिक विजय मिळवेल, अशी अपेक्षा आहे.
एकूणच मायदेशात भारताचा विक्रमही उत्कृष्ट राहिला आहे. भारताने आपल्या भूमीवर आतापर्यंत 289 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी संघाने 117 जिंकले आहेत आणि 55 गमावले आहेत. 1 कसोटी बरोबरीत आणि 215 अनिर्णित राहिली.
विराट कोहली हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 68 पैकी 40 कसोटी जिंकल्या. 17 पराभूत झाले आणि 11 टेस्ट अनिर्णित राहिल्या. यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांचा क्रमांक लागतो. 16 कसोटीत 10 विजयांसह, रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधील भारताचा पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.