हवालदार होणार पोलिस उपनिरीक्षक; गृहमंत्री वळसे पाटलांनी दिली माहिती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

हजारो पोलिस शिपाई, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील हजारो पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळणार आहे. यामुळे पोलिस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टीकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता. या निर्णयाला शुक्रवारी मंजुरी मिळाल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

या पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलिस शिपाई, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे. शिवाय पोलिस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरिता मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल. यामुळे शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी सांगीतले.

पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलिस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलिस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलिस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे 17 हजार 71 वाढतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.