केंद्राचा राज्यांना इशारा; उष्माघातापासून सावध रहा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशासह राज्यात उष्म्याचा तडाखा सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अॅलर्ट जारी केला आहे.

येत्या काळात उष्म्यासंबंधित आजार डोके वर काढू शकतील. त्यामुळे प्रत्येक जिल्हा स्तरावर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात रविवारी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात वाढत्या उष्म्यापासून विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. उष्म्यासंबंधित आजारांवरील ‘राष्ट्रीय कृती आराखडा’ जिल्हा पातळीवर प्रसारित करा, जेणेकरून त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून वैद्यकीय खबरदारी घेतली जाईल, असे आरोग्य सचिव भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

उत्तर-पश्चिम व मध्य हिंदुस्थानातील अनेक राज्ये गेल्या काही आठवडय़ांपासून रेकॉर्डब्रेक तापमानाची दाहकता सोसत आहेत. देशात एप्रिलमध्ये तब्बल 122 वर्षांतील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले आहे. त्यातच मे महिना आणखी उष्ण असण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना अॅलर्ट जारी केला आहे. अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 47 अंशांच्या पातळीवर पोहोचले आहे. या उकाडय़ापासून लवकर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे राज्यांबरोबर केंद्र सरकार ‘अॅलर्ट मोड’वर आले आहे.

केंद्राने राज्यांना दिलेल्या सूचना

– हवामान खाते आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे उष्म्यासंबंधी दररोज जारी केले जाणारे अॅलर्ट जिल्हा स्तरावर पोहोचवा.
– उष्म्यासंबंधी राष्ट्रीय कृती आराखडय़ाच्या अंमलबजावणीवर भर द्या.
– आरोग्य केंद्रावरील सुविधांचा वेळोवेळी आढावा घ्या, आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवा.

डोळ्यांची काळजी घ्या
वाढत्या उष्म्यात डोळय़ांना खाज सुटणे, लालसरपणा तसेच जळजळ होणे असा विविध प्रकारचा त्रास होऊ शकतो. उष्णतेबरोबरच हवेतील प्रदूषकांची उच्च पातळी हे मोठे आव्हान आहे. या काळात डोळय़ांची काळजी घ्या, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे. वैद्यकीय सल्ला गांभीर्याने न घेतल्यास डोळय़ांचा त्रास बळावू शकतो. आपले डोळे उन्हाळय़ात अधिक संवेदनशील बनतात. त्यामुळे या काळात डोळय़ांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.