बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत ; प्रतिक्विंटल १० हजार रुपयांचा भाव

0

पुणेः देशातील बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत आहेत. हळदीचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर वायद्यांमध्ये हळद ११ हजार रुपयांवर पोचले आहेत. हळदीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्याचे जाणकारांनी सांगितले.

यंदा देशातील हळद लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत महत्वाच्या हळद उत्पादक महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात अनेक भागात चांगला पाऊस नाही. तर काही भागात पावसामुळेही लागवडी खोळंबल्या आहेत. चालू हंगामात महाराष्ट्रात १० ते २० टक्क्यांनी लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूतील लागवड १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लागवडही १८ ते २२ टक्क्यानी घटण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटली. सध्या बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी आहे. त्यातच आंध्र प्रदेश आणि काही हळद उत्पादक भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हळदीची बाजारातील आवक कमी झाली. यामुळे दरवाढीला आधार मिळाला. मसाला बोर्डाच्या अंदाजानुसार, देशात १३ लाख ३० हजार टन हळद उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळद बाजारातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.