ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा, योगेश्वर दत्त (कुस्ती)

0

लोकशाही विशेष लेख

योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt) यांचा जन्म २ नोव्हेंबर १९८२ रोजी झाला. घरच्यांनी त्यांचे नाव मनीष ठेवले होते, मात्र सार्वजण लाडाने त्यांना योगी म्हणून हाक मारत असत आणि त्यातूनच योगेश्वर हे नाव रूढ झाले. त्यांचे वडील स्व. राममेहर, आई सुशीला देवी आणि भाऊ मुकेश हे तिघेही पेशाने शिक्षक होते. आपल्या प्रमाणेच योगेश्वर याने देखील शिक्षकच व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पहिलवान होण्याच्या आवडीतून ते लहानपणीच रोज तालमीत जाऊ लागले.

आपल्या मुलाने असा वेळ वाया घालवू नये असे त्यांच्या आईला वाटत होते. मात्र ते अभ्यासात देखील हुशार होते. लहानपणी सर्वात आधी सतबीरसिंग यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. १९९२ साली एक दिवस अचानक ते भिंतीवर लावणारे नवे कोरे घड्याळ घेऊन घरी आले. घरच्यांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी कुस्ती जिंकल्याचे सांगितले. त्या दिवसापासून त्यांचे वडील राममेहर यांनी आपले मत बदलून त्यांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्यासाठी ते स्वत: योगेश्वर यांच्या आहारावर जातीने देखरेख ठेवत असत.

२००६ साली दोहा येथे आशियाई स्पर्धेसाठी गेल्याच्या नवव्याच दिवशी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. याचा त्यांना खूप मोठा भावनिक धक्का बसला, कारण त्यांच्या वडिलांच्या पाठींब्यावरच ते इथपर्यंत पोहोचले होते. हा धक्का पचवून त्यांनी ६० किलो फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली, तसेच २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळात त्यांनी ६० किलो फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ६० किलो फ्री-स्टाईल गटात कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकणारा तो तिसरा भारतीय आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, योगेश्वर दत्त यांना २००९ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न आणि २०१३ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

 

 

 

 

डॉ. निलेश जोशी
जळगाव
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.