मन कि बात : दीपक कुलकर्णी
अठराव्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून येत्या दोन दिवसात पहिल्या टप्प्यातील मतदान देखील होवू घातले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून व्यक्तिगत आरोपांचे मोठ्या प्रमाणावर प्रमाण वाढले आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातही उमेदवारांनी प्रचाराचा श्रीगणेशा केलेला असून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्यातील दोघही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आल्या असून महायुतीतील घटकपक्ष मात्र अद्यापही प्रचारात सक्रिय झालेले दिसत नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद असून त्या ताकदीचा भाजपला फायदा होणार की नाही हे आजच सांगता येत नाही. मध्यंतरी शिवसेनेच्या आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करुन मनातील खदखद बाहेर काढली होती. विधानसभेत कशी मदत करणार हा शब्द आज द्या त्याबदल्यात आम्ही लोकसभेचे काम करु असा त्यांचा हट्ट होता. हा हट्ट मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्ण करण्याचा शब्दही दिला मात्र आमदार, प्रमुख पदाधिकारी कुठेही प्रचारात सक्रिय झालेले दिसत नाहीत. ऐवढेच काय तर पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबभू पाटील देखील सक्रिय दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रावेर मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तर भाजप उमेदवाराला उघड विरोध केला होता. ते अद्यापही सक्रिय नाहीत. आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लतातार्इ सोनवणे हे मतदारसंघात फेरफटका मारतांना दिसत असले तरी भाजपच्या खाद्यांला खांदा लावून काम करतांना दिसत नाही. महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये देखील परिस्थिती वेगळी नाही. जळगावात उद्धवसेनेने आयात उमेदवाराला संधी दिल्याने निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी आहेत. रावेरात तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील हेच प्रचारापासून चार हात लांब गेले आहेत. तेथे रवींद्रभैय्यांना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर झाल्याने त्यांच्या मनात ‘वेगळे’ काही सुरु असल्याची चर्चा आहे. एकंदरीत महायुती व महाआघाडी यांच्यात समन्वयाची ‘महा’अडचण दिसून येत असून उमेदवारांना मात्र पायाला भिंगरी लावून फिरावे लागत आहे. लोकसभेची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी अवघड होवून बसली आहे. पक्षामध्ये झालेली फाटाफुट, कार्यकर्त्यांचे आपसातील वाद, पदाधिकाऱ्यांचे मानापमानाचे ‘ठेके’ हे डोकेदुखी ठरत असल्याने श्रेष्ठींना कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे हे स्पष्टच आहे.
खान्देशची मुलूखमैदान तोफ असा लौकीक असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे सालाबादाप्रमाणे यावेळी काहीसे अलिप्त वाटत आहेत. त्यांनी अद्यापही ‘जोरदार’ भाषण वा माध्यमांसमोर व्यक्तव्य केले नसल्याने त्यांच्या ‘मनात’ काय सुरु आहे, याचा ठाव भाजप नेत्यांना विशेषत: गिरीशभाऊंना घ्यावा लागणार आहे. गावोगाव तर कोठे शे मुलूखमैदान तोफ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.